राज्यातील लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार?; एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 18:43 IST2025-03-21T17:53:53+5:302025-03-21T18:43:38+5:30
Ladki Bahin Yojana: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या वतीने भूमिका मांडली आहे.

राज्यातील लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार?; एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका
Eknath Shinde: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नव्या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात राज्यातील लाडक्या बहिणींना प्रतिमहा २१०० रुपये देण्याबाबतची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु सरकारने तूर्तास तरी हा निर्णय घेणं टाळलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वाढीव रक्कम कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या वतीने भूमिका मांडली आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात सांगितलं आहे की, सरकारने कोणतीही योजना बंद केलेली नाही. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गतही सध्या दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर आम्ही ही रक्कम वाढवून २१०० रुपये देऊ," असं शिंदे यांनी आश्वस्त केलं आहे.
दरम्यान, "महाराष्ट्र हे देशात एक नंबरचं राज्य आहे. जीडीपी, एफडीआय या सगळ्यांत आपण एक नंबरला आहोत. राज्यात मोठ्या प्रमाणात इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहेत. रेल्वे कनेक्टिव्हिटी, एअर कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटीसाठी काम सुरू आहे. नीती आयोगाने सांगितलंय की, फक्त एमएमआर परिसरात १.५ ट्रिलियन इकॉनॉमिची क्षमता आहे. त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था आणखी सुधारणार असून आम्ही दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू," असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.