Aditi Tatkare ( Marathi News ) : विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर राज्यात मागील काही महिन्यांपासून लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याबाबत उत्सुकता होती. अखेर आज महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थी महिलांना खूशखबर दिली असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून वितरीत करण्यास आपण सुरुवात केली आहे, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महायुतीने आम्ही पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवून प्रतिमहिना २१०० रुपये देऊ, असं आश्वासन दिलं होतं. विधानसभेतील दणदणीत विजयानंतर सत्तेत पुनरागमन करणारी महायुती आता आपलं आश्वासन कधी खरं करून दाखवणार, याबाबतची विचारणा होऊ लागली आहे. यावर बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, "लाडक्या बहिणींचे पैसे वाढवण्याबाबत पुढील वर्षी मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय होऊ शकतो."
दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करण्यात आली होती. या योजनेसाठी नव्याने नोंदणी करण्याची संधी मिळणार की नाही, याबाबत मात्र संभ्रम कायम आहे.
निवडणुकीत योजना ठरली गेमचेंजर
महिलांचे सशक्तीकरण व्हावे या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा करण्यास प्रारंभ झाला होता. राज्यामध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारे महिलांसाठी राज्यसरकाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा केले. आतापर्यंत मागील महिन्यात महिलांना ७,५०० रुपये खात्यात जमा झाले आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहितामुळे या योजनेचे अंमलबजावणी करता आली नाही. परंतु आता आचारसंहिता संपली असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह नवे मंत्रिमंडळ ही अस्तित्वात आलेले आहे तेव्हा डिसेंबरचा हप्ता कधी आणि किती रुपयांचा जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले होते.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर करताना काही निकष लावण्यात आले होते. एका कुटुंबात दोनच महिलांना लाभ दिला जाणार, आयकर भरणाऱ्यांना लाभ घेता येणार नव्हता, मात्र अर्ज यशस्वी भरणा झाल्यानंतर पात्र लाभार्थीच्या बँक खात्यात रक्कम जमा होत होती. यात काही ठिकाणी दोनपेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आल्याचा तसेच आयकर भरणा करणाऱ्या कुटुंबातील महिलांनी सुद्धा लाभ घेतला असल्याचा आरोप होत आहे.