ठाणे : संमेलनाचे स्थळ असलेल्या बाळासाहेब ठाकरेनगरीच्या प्रवेशद्वारापासून मुख्य रस्त्यावर बांबूच्या दिव्यांद्वारे केलेली रोषणाई, झाडांसह पदपथांना दिवे-कंदिलांनी आलेला बहर, गडकरी रंगायतनसह मासुंदा तलावाभोवती तशीच चमचमती सजावट यामुळे अवघा परिसर लखलखून गेला होता. नाट्यसंमेलनानिमित्त पहाटेपासून सजलेली मैफल, नाट्यदिंडीने तयार केलेले वातावरण आणि दादोजी कोंडदेव स्टेडियममधील ठाकरेनगरीत उद््घाटनाच्या सोहळ्यानिमित्त दिग्गजांनी भरलेले रंग यामुळे अवघे ठाणे शहर संमेलनमय बनल्याचा प्रत्यय आला. रात्रभर केलेल्या तयारीनंतर जेव्हा मासुंदाचा परिसर झगमगून गेला, तेव्हा नाट्यसंगीताच्या मैफलीसाठी पहाटे जमलेल्या रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. एकीकडे ही रोषणाई आणि दुसरीकडे उगवत्या सूर्याच्या साक्षीने सुरांनी भारलेले असे सुंदर वातावरण अनुभवता आले. नंतर, सुरू झाली ती नाट्यदिंडीची तयारी. ठाण्यातील प्रमुख मार्गांवरून जाणाऱ्या या दिंडीच्या स्वागताला दुतर्फा गर्दी करून, घरांतून-गॅलऱ्यांतून शुभेच्छा देत, प्रसंगी पुष्पवृष्टी, औक्षण करत ठाणेकरांनी गर्दी केली. दिंडीच्या मार्गावर जागोजाग जमलेल्या तरुणाईने कलाकारांसोबत सेल्फी काढत, प्रत्यक्ष दिंडीतील वेगवेगळ्या कला कॅमेऱ्यात बंदिस्त करत लगेचच अपलोड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दिंडी मार्गस्थ होतानाच सोशल मीडियावर लगेचच त्यांचे फोटो-व्हिडीओ व्हायरल होऊ लागले, टिष्ट्वट सुरू झाले आणि अखिल भारतीय संमेलन जगाच्या पाठीवर पोहोचले. उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी नाट्यरसिकांनी खूप अगोदरपासून गर्दी केली होती. कलावंतांना प्रवेश देण्याच्या मार्गालगत जमून त्यांनी त्यांचे फोटो काढले. त्यांना शुभेच्छा तर दिल्याच, पण शेजारच्या प्रदर्शनाच्या मोकळ्या जागांतून व्हीआयपी गेटचा कोपरा पकडून कलाकारांचे व्हिडीओही शूट केले. (प्रतिनिधी)
लखलखली ठाकरेनगरी!
By admin | Published: February 20, 2016 1:56 AM