मुंबई: ‘तो मी नव्हेच’ या नाटकातील लखोबा लोखंडे प्रमाणेच मुलींना लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या तरुणाचा विलेपार्ले पोलिसांनी पर्दाफाश केला. प्रवीण पाटील असे त्याचे नाव असून त्याने आतापर्यंत २५ पेक्षा जास्त तरुणींची फसवणूक करुन त्यापैकी काही मुलींवर लैंगिक अत्याचार केले आहेत.विलेपार्ले परिसरात राहणारी नेहा (नावात बदल) शादी डॉट कॉमवर लग्नासाठी मुलगा शोधत असताना तिची ओळख पाटील सोबत झाली. उच्च पदावर कार्यरत असल्याचे भासवून पाटीलने तिला आपल्या जाळ्यात ओढले. पाटीलच्या उच्चभ्रू राहणीमानामुळे नेहाचा त्याच्यावर जीव जडला. त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत अनैतिक संबंध ठेवले. दोघांनीही लग्न करण्याचे ठरविले. मात्र लग्नापूर्वीच पाटीलने १७ जुलै रोजी तिच्या नकळत तिच्या बँक खात्यातून दीड लाख रुपये काढले. तिने याबाबत विचारणा करताच त्याने बोलणे टाळले. त्यानंतर तो लग्नासाठीही टाळाटाळ करू लागला. तसेच याबाबत कोणाकडेही वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी देखील त्याने दिली. त्यानुसार नेहाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या रक्षा महाराव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करण्यात आला. पोलीस निरीक्षक महादेव निंबाळकर, पीएसआय विकास पाटील, पोलीस नाईक संतोष शिंदे, अंकुश पालवे, अनिल भोसले या तपास पथकाने पाटीलच्या शोध घेण्यास सुरुवात केली. अशात पाटील आणखी एका मुलीला अशाच प्रकारे फसवण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार,पनवेलच्या रिसॉर्टमध्ये पाटील असल्याची माहिती मिळवली आणि त्याला अटक केलीह्ण, अशी महिती विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रक्षा महाराव यांनी दिली. त्याने विविध मॅट्रीमोनियल साइट्सच्या माध्यमातून जोगेशवरी, अंबोली, सातारा, ठाणे, नवी मुंबई, कोल्हापुर, कल्याण, नाशिक, सिन्नर अशा ठिकाणी २५ तरुणींची फसवणूक केल्याचेही तपासात उघड झाले. यापूर्वीही पाटीलला अटक करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा हे ‘प्रताप’ सुरू केले होते. >२२ लाख पगार, गिरगावात ४ बीएचके !पाटील हा उच्च शिक्षित असल्याचे सांगायचा. मी एका जपानी कंपनीत कामाला असून मला बावीस लाख रुपये पगार आहे. गिरगावात माझा ४ बीएचके आहे. तर महाबळेश्वरला देखील पन्नास एकर जमीन आहे,असे तो मुलींना सांगत असल्याचे तपासात उघड झाले आहे. मात्र एवढे होऊनही तो मी नव्हेच तो भूमिका घेत आहे.
विलेपार्ले येथे ‘लखोबा लोखंडे’ गजाआड
By admin | Published: July 21, 2016 2:22 AM