जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरीगडावर चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त सुमारे १ लाखांहून अधिक भाविकांनी देवदर्शन घेत कुलधर्म-कुलाचार केला. राज्याच्या विविध प्रांतांतून बहुजन बांधवांच्या शिखरी काठ्या गडावर दाखल झाल्या होत्या. रणहलगी, ढोल-ताशाच्या गजरात विविध रंगांच्या आणि रंगीबेरंगी रेशमी कापडाने मढविलेल्या शिखरी काठ्या गडावर दाखल होताच बहुरंगी-बहुढंगी महाराष्ट्राचे दर्शन येथे घडत होते. मात्र राज्यात असलेले दुष्काळाचे सावट, निवडणुकीचा काळ आणि तीव्र उन्हाळा यामुळे यावर्षी यात्रेला भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत होते.चैत्र पौर्णिमा उत्सव खंडेरायाचा महत्त्वपूर्ण मानला जातो. चैत्र शुद्ध पौर्णिमेला दुसऱ्या प्रहरी चित्रा नक्षत्र वसंत ऋतू यादिनी शिवशंकरांनी मार्तंड भैरवावतार धारण केला, अशी आख्यायिका असल्याने येथे पुरातन काळापासून मोठी यात्रा भरते. राज्याच्या विविध प्रांतांतील बहुजन बांधव व शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने येथे दाखल होत यळकोट... यळकोट असा गजर करीत भंडाऱ्याची उधळण करीत कुलधर्म-कुलाचार करतात. सालाबादप्रमाणे यावषीर्ही उत्सव साजरा करण्यात आला. श्री मार्तंड देवसंस्थान व्यवस्थापनाकडून भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी मल्हारगडावर सावलीचे आच्छादन करण्यात आले होते. गडकोट आवारात थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. खंडेरायाचे मूळ स्थान असलेल्या कडेपठार मंदिरामध्ये चैत्र षड्रात्रीनिमित्त स्वयंभू लिंगावर दवण्याची पूजा करण्यात आली. पौर्णिमेचे औचित्य साधून नित्यनेमाची पूजा करताना सुगंधी दवणा वनस्पतीने स्वयंभू लिंग आच्छादण्यात आले. यावेळी मनोज बारभाई, सचिन सातभाई, नीलेश बारभाई, कडेपठार देवस्थान सचिव सदानंद बारभाई आदी उपस्थित होते.सुगंधी दवणा वनस्पतीचे महत्त्व कुलदैवत खंडेरायाच्या कुलधर्म-कुलाचार धार्मिक विधींमध्ये दवणा या वनस्पतीला मोठे महत्त्व आहे. दररोजच्या त्रिकाल पूजेमध्ये या सुगंधी वनस्पतींचा वापर केला जातो. तसेच दवणा अत्यंत सुगंधी, अतिशय थंड व गुणकारी समजली जाते. विंचवाच्या दंशावर या वनस्पतीची मुळी उगाळून लावली जाते. विशेष म्हणजे जेजुरी परिसरातच दवणा वनस्पतीचे उत्पादन घेतले जाते. या वनस्पतीपासून अत्तरे, अगरबत्ती तयार केली जाते मात्र डिसेंबर ते मार्च या कालावधीत या वनस्पतीचे उत्पादन घेण्यात येत असल्याने देवांच्या जत्रा-यात्रा उत्सवकाळात ती हिरवी असते. इतर काळात ती वाळवलेली भाविकांना उपलब्ध होते.
जेजुरीत यळकोट यळकोट जय मल्हार च्या जयघोषात चैत्र पोर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी घेतले दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 9:29 PM
चैत्र पौर्णिमा उत्सव खंडेरायाचा महत्त्वपूर्ण मानला जातो. चैत्र शुद्ध पौर्णिमेला दुसऱ्या प्रहरी चित्रा नक्षत्र वसंत ऋतू यादिनी शिवशंकरांनी मार्तंड भैरवावतार धारण केला, अशी आख्यायिका असल्याने येथे पुरातन काळापासून मोठी यात्रा भरते.
ठळक मुद्दे राज्याच्या विविध प्रांतांतील बहुजन बांधव व शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने येथे दाखल