नाशिक : दहावी-बारावीच्या परीक्षा देखील संपल्या नसून उन्हाळी सुटीलाही सुरूवात झालेली नाही; मात्र आतापासूनच घरफोड्यांच्या टोळ्या विविध भागात सक्रिय झाल्याने नागरिक हवालदिल झाले आहे. रविवार पेठेसारख्या गजबजलेल्या ठिकाणी एका बंद घराचे कुलुप चोरट्यांनी संध्याकाळच्या सुमारास तोडून सुमारे २ लाख ७२ हजारांचे दागिने लंपास केल्याचे उघडकीस आले आहे.शहर परिसरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून मागील दोन महिन्यांत एकूण ५४ घरांचे कुलुपांवर चोरट्यांनी हातोडा मारुन लाखोंचे दागिने लंपास केल्याची नोंद पोलिसांच्या दफ्तरी आहे. येणाऱ्या काळात पोलिसांपुढे घरफोड्या रोखण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. उन्हाळी सुटीमध्ये नागरिक मोठ्या संख्येने बाहेरगावी जातत. यामुळे बंद घरांना चोरट्यांकडून मोठ्या प्रमाणात ‘टार्गेट’ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील रविवार पेठ भागातील वैभव अनिल नवले यांच्या मालकीचे खरे सदनच्या दहा क्रमांकाच्या बंद खोलीचे कुलुप घरफोड्यांच्या टोळीने संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले १४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने यामध्ये मंगळसुत्र, साखळी, अंगठी, कानातल्या रिंग्स, डोरले, मुरणी, वेढा यासह आदि दागिण्यांचा समावेश आहे. दोन लाख ७२ हजार रुपये किमतीचे दागिने चोरी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी नवले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घराची पाहणी करून चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तत्काळ श्वान पथकाला पाचारण केले. यावेळी पोलिसांनी पंचनामा करुन चोरट्यांविरु ध्द गुन्हा नोंदविला आहे. श्वानाने घराचा वास घेत परिसरातील गल्ली बोळातून थेट मुख्य रस्त्यापर्यंत चोरट्यांचा माग दाखविला. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक गोसावी करीत आहेत. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये घरफोड्या नित्यनेमाने होत असल्या तरी या घरफोड्यांना आळा घालणे किंवा गुन्ह्यातील संशयितांचा छडा लावण्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला यश येत नसल्याने ‘डीबी’चा वॉच नेमका कोणावर ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जानेवारी महिन्यात शहरात एकूण २६ तर फेब्रुवारीमध्ये २८ असे एकूण ५४ घरे चोरट्यांनी फोडून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास केला आहे.
लाखोंचे दागिने लंपास : नाशिकमध्ये दोन महिन्यांत ५४ घरांचे कुलुप तोडले
By admin | Published: March 09, 2017 3:43 PM