ठाणे : दोन कोटी वृक्षलागवडीच्या वनमहोत्सवाचे औचित्य साधून ठाणे जिल्ह्याने ११३.४० टक्के उद्दिष्ट पार पाडले आहे. सामाजिक संस्थांसह शासकीय यंत्रणांनी सुमारे १२ लाख ५३ हजार रोपांची ठिकठिकाणी लागवड करून त्यांची नोंद घेतली. यामध्ये जिल्ह्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांनी एक लाख ५७ हजार ७११ वृक्षलागवड करून त्यांची निगा ठेवण्यासाठी नियोजन केले आहे. लोकचळवळ ठरलेल्या या वनोत्सवात महसूल विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, त्याचप्रमाणे वन विभाग, सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगून वन विभागाने विकसित केलेल्या संगणक प्रणालीद्वारे नोंद झालेल्या १२ लाख ५३ हजार वृक्षलागवडीची माहिती दिली. यामध्ये सर्वाधिक वृक्षारोपण करून वन विभागाने पाच लाख ३८ हजार ६६० रोपांची लागवड केली. याशिवाय, शहापूर वन विभागाने दोन लाख ७७ हजार ११९, येथील सामाजिक वनीकरण विभागाने नऊ हजार ६००, महाराष्ट्र वनविकास महामंडळाने नऊ हजार ३००, कृषी विभाग एक लाख १५ हजार ९२५, ग्रामविकासने एक लाख २१ हजार ५०६, महसूल खात्याने १० हजार, तर अन्य सर्व यंत्रणांनी उर्वरित १३ हजार ६४० रोपे लावल्याचे नोंद सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक सतीश फाले यांनी सांगितले. याशिवाय, येथील पर्यावरण संवर्धन संस्थेद्वारे उच्चभ्रू लोकवस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओसवाल पार्क, राम मंदिर रोड , कासारवडवली, हसननगर, खोपट, परुळेकर गार्डन, जय टॉवर, स्वस्तिक पाल्म, प्रथमेश टॉवर आदी ठिकाणी सुमारे २६० वृक्षलागवड करून संगोपनाचे नियोजन केल्याचे संस्थेचे अध्यक्ष ओंकार अधिकारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वृक्षलागवड झाली लक्षाधीश!
By admin | Published: July 04, 2016 4:48 AM