पैठण (जि. औरंगाबाद) : नगरपालिका निवडणुकीत मतदारांना लक्ष्मी-दर्शनाचे आवाहन केल्याबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्या फिर्यादीवरून बुधवारी मध्यरात्री पैठण पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पैठण येथे भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ १७ डिसेंबर रोजी झालेल्या सभेत खा. दानवे यांनी मतदारांना, ‘लक्ष्मी घरी आली तर तिला परत करू नका, तिचे स्वागत करा,’ असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानास आक्षेप घेत काँग्रेस, शिवसेना व आपतर्फे निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. पैठणचे निवडणूक निर्णय अधिकारी केशव नेटके यांनी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता.राज्य निवडणूक आयोगाने २८ डिसेंबर रोजी कारवाईचे निर्देश औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी केशव नेटके यांनी दानवे यांच्याविरुद्ध मतदारांना प्रलोभन व लाच घेण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी भादंवि कलम १७१ (ब) आणि महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५च्या कलम २२(१) नुसार कारवाई करावी, अशी फिर्याद दिली आहे.पोलिसांचा अर्जपैठण पोलीस ठाण्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले. अधिक तपास करण्यास परवानगी मिळावी म्हणून पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला आहे.
‘लक्ष्मीदर्शन’ भोवले; दानवेंविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Published: December 30, 2016 5:07 AM