ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - लालबाग, परळ, हिंदमाता, वडाळा परिसर हा शिवसेनेचा परंपरागत बालेकिल्ला. पण यंदाच्या महापालिका निवडणुकीत इच्छुकांनी बंडाचे निशाण फडकवल्यामुळे शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पालिकेत आपला महापौर बसवण्यासाठी एफ-साऊथ वॉर्डमधून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणे शिवसेनेसाठी आवश्यक आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्यादिवशी लालबाग-परळचे लोकप्रिय शिवसेना नगरसेवक नाना आंबोले यांनी बंडखोरी करत भाजपामध्ये प्रवेश केला. 2012 मध्ये त्यांनी इथून 15 हजाराच्या मोठया मताधिक्क्याने विजय मिळवला होता. त्यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांनी पत्नीसाठी उमेदवारी मागितली होती. त्यांची पत्नी इथून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहे.
वॉर्ड नंबर 202 मधून माजी महापौर श्रध्दा जाधव रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर दोन बंडखोरांनी आव्हान निर्माण केले आहे. तशीच परिस्थिती शेजारच्या हिंदमातामध्येही आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारा विरोधात कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्याच रागातून हिंदमाता शाखेला टाळे ठोकण्यात आले होते. अशा परिस्थितीत 2012 मध्ये शिवडी विधानसभा मतदारसंघातून जिंकलेल्या पाच जागा कायम राखण्याचे शिवसेनेसमोर आव्हान आहे. 1966 साली शिवसेेनेची स्थापना झाल्यानंतर इथला तरुणवर्ग शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाने आकर्षित झाला आणि वेगाने शिवसेना या भागामध्ये फोफावली.पण मनसेच्या उदयानंतर इथली परिस्थिती हळूहळू बदलत गेली.
पारंपारिक मराठीबहुल लोकवस्तीच्या या भागाचे वेगाने रुपडे बदलत चालले आहे. मध्यवर्गीय मराठी भाषिकांचा हा परिसर कॉस्मोपॉलिटन होत चालला आहे. अन्य भाषिकांचेही इथे प्राबल्य वाढू लागले आहे. परेल-लालबागमध्ये अनेक मोठमोठ टॉवर उभे राहिले असून बिगर मराठी भाषिकांचा टक्काही वाढला आहे. गुजराती भाषिकांची संख्याही वाढत चालली असून, अनेक जुन्या, जर्जर झालेल्या इमारती पूर्नबांधणीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक शिवसेनेसाठी सोपी नाही.