संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या ड्रग्स प्रकरणातील माफिया ललित पाटील याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, ललित पाटिलला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले आहे. तिथे प्रसारमाध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, ललित पाटील याने धक्कादायक दावा केला आहे. मी ससून रुग्णालयातून पळून गेलो नव्हतो, तर मला पळवण्यात आलं होतं. यामागे कुणाकुणाचा हात आहे, हे मी सगळं सांगणार आहे, असा दावा ललित पाटीलने केला आहे.
ड्रग रँकेट प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याचा भाऊ आणि मेफेड्राँन बनविणारा भूषण पाटील व अभिषेक बलकवडे या दोघांना पुणे पोलिसांनी १० ऑक्टोबरला नेपाळ बाँर्डरवर पकडले होते. तर फरार ललित पाटील याचा शोध घेण्यात येत होता. अखेर आज त्याच्या चेन्नई येथून मुसक्या आवळण्यात आला. ललित पाटील हा श्रीलंकेमध्ये पळण्याच्या तयारीत होता असा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, अटक करण्यात आल्यानंतर ललित पाटील याला मुंबईत आणण्यात आले आहे. तसेच रुग्णालयामध्ये त्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी त्याला दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर ललित पाटील हा नाशिकला गेला होता. तिथे काही काळ राहिल्यानंतर तो इंदूरला गेला. तर तिथून गुजरातला गेला होता. त्याठिकाणाहून त्याने टूर्स आणि ट्रॅव्हल्स गाडी भाड्याने घेतली. त्या गाडीने तो कर्नाटकात गेला. यादरम्यान, त्याने महाराष्ट्रातून प्रवास केला. त्यानंतर तो चेन्नईला पोहचला. नाशिकमध्ये मुंबई पोलिसांनी कारवाई केली तेव्हा ललित पाटीलच्या एका निकटवर्तीयाला अटक करण्यात आली होती. परंतु याची कुठलीही खबर माध्यमांना लागून दिली नाही. पोलिसांच्या अटकेत असलेल्या या आरोपीलाच ललित पाटीलचा फोन आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी व्यक्तीला ललित पाटीलशी बोलायला सांगितले. त्यानंतर ललितने कशारितीने तो फरार झाला, कुठून कसा गेला हे सांगितले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी पाठलाग करून ललित पाटीलला चेन्नईतून अटक केली.