मुंबई – ललित पाटील ड्रग्स प्रकरणी चर्चेत आलेले पुण्याच्या ससून रुग्णालयातील डीन संजीव ठाकूर यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाला होता. या घटनेनंतर विरोधकांनी सातत्याने ससूनचे डीन संजीव ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केले होती. संजीव ठाकूर यांची चौकशी व्हावी, त्यांना पदावरून दूर करावे अशी मागणी विरोधक करत होते. अखेर राज्य शासनाने शुक्रवारी हा निर्णय घेतला.
या प्रकरणी राज्याचे वैद्यकीय आयुक्त राजीव निवतकर यांनी दिलेल्या चौकशी अहवालानंतर वैद्यकीय शिक्षण विभागानं ही कारवाई केली आहे. त्याचसोबत ससून इस्पितळाचे अस्थि व्यंग उपचार पथक प्रमुख डॉक्टर प्रवीण देवकाते यांनाही निलंबित करण्यात आले आहे. वैद्यकीय विभागाच्या या कारवाईनंतर आता पुणे पोलीस पुढे काय कार्यवाही करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
संजीव ठाकूर यांच्या सूचनेनुसार, डॉ. प्रविण देवकाते हे ललित पाटीलवर उपचार करत होते. ललित पाटील फरार झाल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणी चौकशी समिती गठीत केली होती. त्यात ४ जणांचा समावेश होता. या समितीने आता अहवाल दिला आहे. त्यात संजीव ठाकूर आणि प्रविण देवकाते यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
दरम्यान, डॉ. संजीव ठाकूर यांची बी.जे. अधिष्ठातापदावरून उचलबंगडी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. पूर्वीचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची मध्यावधी बदली झाली होती. त्या विरोधात त्यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला. मॅटने डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, त्या विरोधात डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्याचा निकाल आज न्यायालयाने दिला. त्यात पून्हा अधिष्ठातापदी डॉ. काळे यांना नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बीजे वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची जानेवारी महिन्यात तडकाफडकी बदली करण्यात आली होती. ससून रुग्णालयातील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. तर डॉ. संजीव ठाकूर यांची वर्णी ससूनच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली होती.