लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एसटीसाठी एप्रिल ते जून हा जास्त उत्पनाचा कालावधी असतो. कोरोना पूर्व काळात दररोज ६५ लाख जण एसटीने प्रवास करीत होते. संपातून कर्मचारी पुन्हा कामावर आल्यानंतर गाड्यांची संख्याही वाढत आहे, तसेच प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसटी प्रवासी संख्या २९ लाख पार गेली असून, उत्पन्न १७ कोटींपर्यंत गेले आहे.
राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. कोरोनामुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर एसटीचे आर्थिक चाक पूर्वगतीवर येत असतानाच ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपामुळे कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. कोरोनापूर्व काळात एसटीच्या १८ हजार गाड्या धावत होत्या. या गाड्यांच्या एक लाख फेऱ्या होत होत्या. त्यातून ६५ लाख जण प्रवास करीत होते, तर २४ कोटींचे उत्पन्न मिळत होते. सध्या १३१४७ गाड्या सुरू असून, त्यातून २८.६४ लाख जण प्रवास करीत आहेत, तर १६. ८३ कोटींचे उत्पन्न मिळत आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
९०६४६ कर्मचारी उपस्थित एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांचा संप सुरू होता. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर मोठ्या संख्येने कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. बुधवारपर्यंत ९०६४६ कर्मचारी उपस्थित झाले आहेत.