- महेश चेमटेमुंबई : उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी जाण्यासाठी नागरिकांची प्रथम पसंती एसटी महामंडळाला असते. यानुसार महामंडळाने १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीत राज्यभर ९०० विशेष एसटी चालवण्यास सुरुवात केली आहे. तसेच वातानुकूलित शिवशाहीच्या पहिल्या टप्प्यातील तब्बल ७०० शिवशाही महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या एसटीला ‘लालपरी’सह ‘शिवशाही’चीदेखील साथ मिळाल्याने प्रवाशांना दिलासा मिळत आहे.महामंडळाच्या नियमांप्रमाणे १५ एप्रिल ते १५ मे हा तीस दिवसांचा काळ साधारणपणे प्रवासी गर्दीचा काळ मानला जातो. या कालावधीत उन्हाळी विशेष फेऱ्या चालवण्याचे नियोजन महामंडळाचे असते. यानुसार सद्य:स्थितीत आंतरप्रादेशिक मार्गावर आणि ३१६ एसटी, मुंबई-पुणे प्रदेशांतर्गत प्रत्येकी ३१६ जादा एसटी सुरू आहेत. त्याचबरोबर विदर्भात १०४ एसटी, मराठवाड्यात ११७ आणि खानदेश भागात ९७ एसटी उन्हाळी विशेष (जादा) म्हणून सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र एकीकडे जादा एसटीच्या विशेष फेºयांनी प्रवासी सुखावले असले तरी दुसरीकडे महामंडळाच्या योजनेचा ‘एसटीचे तिकीट दाखवा, ३० रुपयांत चहा-नाष्टा मिळवा’ या योजनेचा बोजवारा उडाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. यामुळे विशेष एसटीसह महामंडळाने अधिकृत हॉटेल थांब्यावरदेखील या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले.विक्रमी उत्पन्नाची आशाउन्हाळी सुट्टीनिमित्त महामंडळाने राज्यभर सुमारे ९०० जादा एसटी चालवण्याचा निर्णय घेतला. एका एसटीमध्ये आसन क्षमता सरासरी ५० असते. १५ एप्रिल ते १५ मे या काळात लग्नाचे १७ मुहूर्त आहेत. लग्नसराईसाठी वातानुकूलित शिवशाहीदेखील योग्य दराने मिळत असल्याने महामंडळाला यंदाच्या उन्हाळी सुट्टीमधून विक्रमी उत्पन्नाची आशा आहे.
‘लालपरी’ला मिळाली ‘शिवशाही’ची साथ, उन्हाळी सुट्टीनिमित्त ९०० विशेष एसटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 3:29 AM