पुणे : ‘लाल दिवा ही फार छोटी गोष्ट आहे. अनेक लोक पंधरा-पंधरा वर्षे लाल दिवा लावून फिरले. मात्र, काहीच करू शकले नाही. त्यामुळे मनातला लाल दिवा पेटला पाहिजे. गाडीचा लाल दिवा पेटून चालणार नाही. ज्याच्या मनातील लाल दिवा पेटतो तेच परिवर्तन करू शकतात. सदाभाऊ खोत यांच्या मनातील दिवा पेटलेला आहे. त्यामुळे ते निश्चित परिवर्तन करून दाखवतील, असे सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे खोत यांना मंत्रीपद मिळणार नसल्याचे सुतोवाच केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या ‘बळीचा आक्रोश’ या पुस्तकाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास गृहराज्यमंत्री राम शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटने अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद देशमुख, चित्रपट निर्माते कैलास वाणी आदी उपस्थित होते. समारंभात सदाभाऊ खोत यांच्या कार्याचे फडणवीस यांनी कौतुक केले. त्यावेळी सभागृहातील खोत यांच्या एका समर्थकाने ‘लाल दिवा कधी?’ असा प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘खोत यांच्यासारख्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांची आम्हाला गरज आहे. लाल दिवा फार छोटी गोष्ट आहे. मनातला दिवा पेटतो, तोच परिवर्तन घडवून आणू शकतो. खोत यांच्या अनुभवाचा आम्हाला नक्कीच फायदा होईल.’ फडणवीस यांच्या या सूचक वक्तव्यामुळे सदाभाऊ खोत यांना मंत्रीपदासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार असल्याची चर्चा सभागृहात सुरू झाली. खोत आमच्यात आले, तर शेतकऱ्यांना दिशा आणि त्यांची दशा दाखविण्याचे काम कोण करणार, असा मार्मिक सवाल करत, दानवे यांनीही खोतांच्या उत्साहावर विरजण टाकले. (प्रतिनिधी)नागपूर : शक्ती असलेली व्यक्ती जगण्याची लढाई सहज जिंकते. मात्र, दुर्बलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाला त्यांची शक्ती बनावे लागेल. त्यांना उभे करावे लागेल, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.पुणे सेवासदन सोसायटी नागपूरतर्फे यावर्षीपासून सुरू करण्यात आलेला रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कार ‘संज्ञा संवर्धन संस्था, नागपूर’ या संस्थेला देण्यात आला. अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश्वर उत्तरवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सरकारमध्ये चांगले काम करणाऱ्यांना बक्षीस व वाईट काम करणाऱ्यांना शिक्षा मिळत नाही, पण समाजात नेहमी चांगले काम करणाऱ्यांचा गौरव होतो. महिलांना बरोबरीने जगता यावे, त्यांना शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी रमाबाई रानडे यांनी या कामाची सुरुवात केल्याचे सांगून कोणत्याही क्षेत्रात स्त्री-पुरुष या आधारावर मूल्यमापन होऊ नये, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.सेवासदनने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी स्वत:ला वाहून घेतले, पण काही संस्था खूप डोनेशन घेतात. एक प्रकारे पार्टनरशीप सुरू आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व्हावे, पण व्यापारीकरण होऊ नये, शिक्षणाचे दुकान होऊ नये, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.
मनातील दिवा पेटलेला असावा
By admin | Published: January 04, 2016 3:07 AM