नवी मुंबई : सिडकोच्या नैना क्षेत्रात भूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. स्वस्त घरांचे आमिष दाखवून सर्वसामान्य ग्राहकांची लूट केली जात आहे. मोकळ्या भूखंडांना कुंपण घालून त्यावर प्रस्तावित गृहप्रकल्पांचे फलक चढवून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. त्यास रोक लावण्यास सिडकोला सपशेल अपयश आल्याने दररोज शेकडो लोक फसविले जात आहेत.विमानतळ प्रभावित क्षेत्रात मोठमोठ्या गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे या परिसरातील जमिनीच्या किमतीसुध्दा वाढू लागल्या आहेत. नेमका याचा फायदा घेत भूमाफियांनी आता नैना क्षेत्रातील मोकळ्या भूखंडांवर डोळा ठेवला आहे. मोकळ्या जागा बळकावून त्यावर मोठमोठे गृहप्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. अनेकांनी मोकळ्या भूखंडांना कुंपण घालून गृहप्रकल्प प्रस्तावित केले आहेत. त्याचे जोरदार बुकिंगही सुरू करण्यात आले आहे. विशेषत: नैना क्षेत्रांतर्गत मोडणाऱ्या सुकापूर, नेरे, उम्रोली, विचुंबे, तळोजा आदी परिसरात हा प्रकार सुरू आहे. या विभागात सध्या शेकडो नवीन गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत, तर अनेक प्रकल्प प्रस्तावित करून घरांचे बुकिंग सुरू करण्यात आले आहे. या परिसरात सध्या तीन ते चार हजार रूपयांनी घरांची बुकिंग घेतली जात आहे. शेजारच्या विकसित क्षेत्राच्या तुलनेत हे दर कमी असल्याने सर्वसामान्य ग्राहक त्यात सहजरीत्या फसताना दिसत आहेत. विमानतळ प्रभावित क्षेत्रात मोडणाऱ्या ठाणे, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण आणि उरण या तालुक्यातील २५ किलोमीटर क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून शासनाने सिडकोची नियुक्ती केली आहे. त्यानुसार सिडकोने या परिसराचा टप्प्याटप्प्याने विकास करण्याची योजना तयार केली आहे. पहिल्या टप्याचा विकास आराखड्यास येत्या महिनाभरात मंजुरी मिळेल, असा विश्वास सिडकोला वाटत आहे. असे असले तरी या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास तीन वर्षाचा विलंब लागल्याने या क्षेत्रातील विकासकांची कोंडी झाली आहे. त्यामुळे अनेक प्रस्तावित प्रकल्प परवानगीअभावी रखडले आहेत. याचा नेमका फायदा भूमाफियांनी घेतला आहे. मोकळ्या जागांवर विनापरवाना गृहप्रकल्प उभारले जात आहेत. (प्रतिनिधी)>विशेष म्हणजे भूमाफियांना आळा घालण्यास सिडकोच्या संबंधित विभागाला सपशेल अपयश आल्याने त्यांचे चांगलेच फावल्याचे दिसून आले आहे.
नैना क्षेत्रात भूमाफियांचा धुमाकूळ
By admin | Published: July 21, 2016 2:50 AM