वाशिम, दि. १0- नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन-वे अर्थात समृद्धी महामार्ग निर्मितीची प्रक्रिया सद्या वेगात सुरू असून यासाठी लागणार्या १५00 हेक्टर जमिनीपैकी सुमारे १५२ एकर जमीनीची शुक्रवार, १0 मार्चला मोजणी होणार होती. तशाप्रकारच्या नोटिसा देखील शेतकर्यांना गुरूवारी देण्यात आल्या. मात्र, नियोजित स्थळी शेतकरी दिवसभर उपस्थित असताना जमीन मोजणी पथक त्याठिकाणी फिरकलेच नसल्याचा प्रकार घडला.विकासाचा मार्ग म्हणून गणल्या गेलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग जिल्ह्यातील ४ तालुक्यांमधील ५२ गावांमधून जात आहे. यासाठी सुमारे १५00 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. शेतकर्यांमधून मात्र या महामार्गासाठी जमीनी देण्यास विरोध अद्याप कायम असून भूसंचय आणि भूसंपादनाच्या बदल्यात मिळणार्या मोबदल्यासंबंधी शासनस्तरावरून जोपर्यंत ठोस धोरण अंगिकारले जात नाही, तोपर्यंत हा विरोध कायमच राहील, असा पवित्रा शेतकर्यांनी घेतला आहे. दरम्यान, उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालयाकडून शेतकर्यांना ९ मार्चला नोटिसा देण्यात आल्या. १0 मार्चला सकाळी १0 वाजेपासून जमिनीची मोजणी होणार असून त्यासाठी संबंधितांनी उपस्थित राहण्याबाबत त्यात कळविण्यात आले होते. त्यानुसार, संबंधित जमिनधारक शेतकरी त्या-त्या नियोजित स्थळी अगदी वेळेवर हजर झाले. मात्र, जमिन मोजणी करणारे पथक अथवा महसूल खात्यातील कुठलाच अधिकारी, कर्मचारी दिवसभरात हजर झाला नाही. त्यामुळे सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रतीक्षा करून शेतकर्यांनी परतीचा मार्ग धरला. समृद्धी महामार्गासाठी जमिनी देणार्या शेतकर्यांचे हित शासनाने जोपासले आहे. भूसंपादन आणि भूसंचय अशा दोन पद्धती यासाठी अंगिकारण्यात आल्या असून मिळणार्या फायद्यांबाबत देखील शेतकर्यांचे उद्बोधन करण्यात आले. बहुतांश शेतकर्यांना ही संकल्पना पटली. मात्र, मूळ शेतकरी वगळता इतरांमधूनच प्रक्रियेस विरोध होत असून ही बाब विकासाला बाधा पोहचविणारी ठरू शकते. तथापि, जमिन मोजणीबाबत शेतकर्यांना गुरूवारी नोटिसा देण्यात आल्या होत्या. शुक्रवारी मोजणी होणार होती. परंतू ती रद्द करून ही प्रक्रिया आता १४ मार्चला राबविण्यात येणार आहे.- सुनील माळी, क्षेत्रीय अधिकारी तथा प्रशासक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, वाशिम
जमीन मोजणी पथक फिरकलेच नाही !
By admin | Published: March 11, 2017 2:35 AM