ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. १० - सांगली : जमीन वादातून एकाने पत्नी, आई व दोन मुलींचा निर्घृण खून केल्याची घटना कुडनूर (ता. जत) येथे शनिवारी पहाटे घडली. आई सुशिला कुंडलिक इरकर (वय ६०), पत्नी सिंधुबाई भारत इरकर (४०), मुली रूपाली भारत इरकर (१९) व राणी भारत इरकर (१६) अशी मृतांची नावे आहेत. घटनेनंतर संशयित भारत इरकर (वय ४६) जत पोलिस ठाण्यात हजर झाला आणि त्याने खुनाची कबूली दिली. भारत इरकर वारकरी संप्रदायातील आहे. त्याच्या वडिलांनी दोन विवाह केले होते. त्याची आई सुशिला त्याच्यासोबत शेतातील घरात रहात होती, तर सावत्र आई सांगलीत राहते. सावत्र आईसोबत त्याचा ३२ एकर शेत जमिनीवरुन वाद आहे. हा वाद मुंबई उच्च न्यायालयापर्यंत गेला आहे, पण भारत खटल्याच्या सुनावणीला हजर राहत नव्हता. त्यामुळे न्यायालयाने पकड वॉरंटही बजावले होते. ही शेतजमीन आपल्या ताब्यातून गेली तर मुला-बाळांनी जगायचे कसे, या विचाराने तो अस्वस्थ होता. यातून त्याने शनिवारी पहाटे साडेपाच वाजता कोयत्याने गाढ झोपेत असलेल्या आई, पत्नी व दोन मुलींवर हल्ला केला. त्याने कोणालाही प्रतिकार करण्याची संधी दिली नाही. घरात रक्ताचा पाट वाहत होता.
दोन मुले बचावलीभारतला बाळाप्पा व आकाश ही आणखी दोन मुले आहेत. बाळाप्पा आठवीला, तर आकाश सहावीला आहे. दोघेही शुक्रवारी कुडनूर गावात आत्याच्या घरी अभ्यासाला गेले होते. खूप वेळ झाल्याने ते जेवण करुन तेथेच झोपले. ते घरात असते; तर त्यांचाही खून झाला असता, असे पोलिसांनी सांगितले.