जळगाव : सावदा येथील भाजपाचा माजी नगरसेवक नंदकुमार पाटील व त्याचा भाऊ सुधाकर पाटील हे अवैध सावकारी करत असून, त्यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या नावाचा धाक दाखवून रावेर तालुक्यातील १८ शेतकऱ्यांची १०८ हेक्टर जमीन हडपली , असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी गुरुवारी जळगावात पत्रकारांशी बोलताना केला. जिल्ह्यात मुक्कामी असलेल्या दमानिया यांची रावेर तालुक्यातील १८ शेतकऱ्यांनी भेट घेतली व व्यथा मांडल्या. त्यानंतर दमानिया यांनी या शेतकऱ्यांना सावकाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.तक्रारी केल्या तर पोलीस आणि सहायक निबंधक, उपनिबंधक, प्रशासन त्या बेदखल करतात. हाणामारी, दमदाटीमुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. तर एका शेतकऱ्याच्या मुलाचा गळा चिरण्याचा प्रयत्नही झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळवून द्याव्यात, अशी मागणी दमानिया यांनी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात येईल व चौकशी करून योग्य ती कार्यवाही करू, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)लिमोझीन जप्त का केली नाही?दमानिया यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) सुभाष वारे यांची भेट घेऊन महसूलमंत्री खडसे यांच्या जावयाची लिमोझीन जप्त का केली जात नाही, असा जाब विचारला. त्यावर ४८ तासांत लिमोझीनची तपासणी करू, गरज भासली तर या कारचे मालक डॉ. प्रांजल खेवलकर यांनाही आरटीओ कार्यालयात बोलावू, असे आश्वासन आरटीओ वारे यांनी या वेळी दिले.
मंत्री खडसे यांचा धाक दाखवून हडपल्या जमिनी
By admin | Published: May 27, 2016 12:35 AM