संतोष येलकर/अकोला विदर्भ-मराठवाडयातील शेतकर्यांना निवासी प्रशिक्षण आणि युवकांसाठी कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला जिल्ह्यातील चिखलगाव येथे उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचा प्रस्ताव मात्र गत अडिच वर्षांपासून शासन दरबारी धूळ खात पडून आहे.शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भ तसेच मराठवाड्यातील शेतकर्यांना कृषीवर आधारित निवासी प्रशिक्षण देणे, महिला शेतकर्यांना गुहउद्योगाचे प्रशिक्षण आणि शेतक-यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानासोबतच कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरु करण्याची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने विदर्भ आणि मराठवाड्यासाठी सोयीस्कर ठरणार्या अकोला जिल्ह्यात मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव करण्यात आला होता. त्यासाठी अकोला जिल्ह्यातील चिखलगाव येथे आवश्यक शासकीय जमिन मागणीचा प्रस्ताव मुक्त विद्यापीठाच्या अमरावती येथील विभागीय संचालकांमार्फत २0१२ मध्ये अकोला जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आला. तसेच चिखलगाव येथील संबंधित जमिनीचे मोजमाप भूमि अभिलेख विभागामार्फत करण्यात आले. त्यानंतर १७.0२ हेक्टर जमिनीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १0 फेब्रुवारी २0१२ रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत हा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. अडिच वर्षांपासून या प्रस्तावाचा प्रवास सुरू आहे; मात्र अद्यापही त्याला शासनाकडून मान्यता मिळाली नाही. मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी अकोला जिल्ह्यातील चिखलगाव येथील १७.0२ हेक्टर जमिन मागणीबाबतचा प्रस्ताव १0 फेब्रुवारी २0१२ रोजी विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला असून आयुक्तांमार्फत तो शासनाकडे पाठविण्यात आला आहे. आता शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रमोद देशमुख यांनी सांगीतले तर विदर्भ आणि मराठवाड्यासाठी सोयीस्कर ठरणा-या उपकेंद्रासाठी जमिन मागणीच्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी मिळणे आवश्यक असल्याचे मत मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. अनिरुध्द जायले यांनी नोंदविले. **विदर्भ आणि मराठवाड्याला होणार लाभ!मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला जिल्ह्यात सुरु झाल्यास, त्याचा लाभ विदर्भासह मराठवाड्यातील शेतकरी आणि सुशिक्षीत बेरोजगार युवकांना होईल. या उपकेंद्राव्दारे विदर्भ व मराठवाड्यातील शे तकर्यांना कृषीवर आधारित प्रशिक्षण तसेच शेतीपुरक उद्योगांचे प्रशिक्षण आणि माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमही तयार करण्यात येणार असून, त्याव्दारे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल.
मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी जमिनीचा प्रस्ताव धूळ खात
By admin | Published: September 19, 2014 2:07 AM