तरडगाव : गावचा पाणी प्रश्न कायमचा मिटावा, यासाठी साठवण तलाव उभारण्याचे काम सुरू झाले. मात्र खोदकामात जैन मंदिर ट्रस्ट व अन्य एका शेतकऱ्याची शेतीच्या पाण्याची पाइपलाइन फुटल्याने दोन्हीकडील २१ एकर उसाला गेल्या अनेक दिवसांपासून पाणी न मिळाल्याने ते पीक धोक्यात आले आहे. तरी संबंधितांनी दुसरीकडून नवीन पाइपलाइन करून द्यावी, अशी मागणी सुरुवातीपासूनच होत आहे.पाणी पुरवठा समिती अध्यक्ष विजयकुमार शहा यांनी गावाला बारमाही व पालखी सोहळा काळात पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी स्वमालकीची ४० गुंठे जागा साठवण तलाव बांधण्यासाठी दान केली होती. ती जागा अपुरी पडत असल्याने पुन्हा ५ गुंठे जागा दिली. या जागेत काही दिवसांपूर्वी कामाला सुरुवात झाली. खोदकाम सुरू असताना विजयकुमार शहा ट्रस्टी असलेल्या जैन मंदिर ट्रस्टची व अन्य एका शेतक-याची अशा या जागेतून गेलेल्या दोन पाण्याच्या पाइपलाइन फुटल्या. असे असताना ठेकेदाराकडून मात्र त्यावर अजून उपाययोजना न झाल्याने ज्याने गावच्या पाण्याच्या योजनेतील साठवण तलाव उभारण्यासाठी स्वत:ची ४५ गुंठे जागा दान केली, त्यालाच त्यांच्या ट्रस्टअंतर्गत असलेल्या शेताला पाणी मिळवणे मुश्कील बनले आहे.
तलावासाठी जमीन देणारा शेतकरी उपाशी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2018 5:48 PM