- अ. पां. देशपांडे अभियांत्रिकीची कामे बाबा आदमच्या काळापासून चालू आहेत. पण ती गुरू-शिष्य परंपरेतून. गवंडी विटा वाहून आणणाऱ्याला हळूहळू थापी, करणी कशी मारायची, पलिस्तर कसे करायचे ते शिकवतो. त्याला पाणसळ (स्पिरीट लेव्हल), ओळंबा (प्लम बॉब) हे मराठीतले शब्द कानावर पडून पडून वापरता येत असत, हे शब्द मुळातले मराठी आहेत आणि त्याचे इंग्रजी भाषांतर झाले की, मुळात ते इंग्रजीत होते आणि त्याचे मराठीत भाषांतर झाले हे ठाऊक नाही. पण या दोन्ही शक्यता नाकारून जगाच्या सर्व देशांत अनादी काळापासून बांधकाम चालू असल्याने, प्रत्येक भाषेत असे शब्द तयार झाले व नंतर ते इंग्रजीशी जोडले गेले. आज जशा परिभाषा समित्या स्थापन करून त्यांच्यापुढे इंग्रजी शब्द ठेवले जातात व त्याची भाषांतरे अथवा तर्जुमा मराठीत केला जातो, तसे या प्रकारच्या शब्दांबाबत नक्कीच झाले नाही. उदाहरणार्थ भारतात इंग्रजांचा अंमल सुरू होण्यापूर्वी बाराव्या शतकात ज्ञानेश्वरांच्या काळी त्यांनी एक भिंत चालवल्याची कथा प्रसृत आहे. भिंत चालवली की, नाही हे आपण सोडून देऊ. पण भिंतीचा उल्लेख तर आहे ना? मग ती बांधण्यासाठी गवंडी, विटा वाहून आणणारा माणूस होताच. त्या गवंड्याने पाणसळ, ओळंबा वापरलेच ना? माझा ज्ञानेश्वरीचा अभ्यास नसल्याने पाणसळ, ओळंबा यांना त्यात काय म्हटले आहे, ते मला ठाऊक नाही.जुन्या काळातील जेवढे अभियांत्रिकीचे ज्ञान होते, त्यासाठीचे बरेचसे शब्द मराठीत उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, भारतात शंभर वर्षांहून अधिक काळ वस्त्रोद्योग चालू आहे. त्यामुळे शटलला घोटा, स्लाईव्हरला पेळू, वार्प व वेफ्टला ताणाबाणा, टेक्चरला पोत हे शब्द आपल्याला ठाऊक आहेत. हे शब्द मराठीत आहेत, पण कापडांच्या जातींची नावे इंग्रजीत आली, त्यांना आपण मराठीत नावे दिली नाहीत. उदाहरणार्थ, पॉपलीन, नायलॉन, टेरिलीन, टेट्रोन, डेक्रोन.. पण वूलन शेकडो वर्षांचे जुने असल्याने त्याला लोकरीचे कापड हा शब्द मराठीत रूढ झाला आहे. तसेच कॉटनला सुती कपडा. काही शब्द मराठीत आले तर काही इंग्रजीतच राहिले. उदा. धावा मराठीत आल्या, पण टायर इंग्रजीच राहिला. हॉर्नला मराठीत पोंगा शब्द आला, पण तो जोपर्यंत रबरी होता, तोवर तो कानाला सहन होत होता. आता तो कर्कश्य झाला आणि रिव्हर्सिंग हॉर्न तर कानाचा पडदा फाडतो की काय अशी भीती वाटते. मी एका पेट्रोरसायनांच्या कारखान्यात ३0 वर्षे काम केले. तेथील माझे कामगार हे तेथे पूर्वी भातशेती करणारे होते. त्यांच्याकडून जमिनी घेऊन तेथे कारखाना उभारला व त्या लोकांना कामगार म्हणून घेतले. या लोकांना इंग्रजी अजिबात येत नव्हते. आणि पेट्रोरसायनांचा कारखाना तर १९६५चे जगातील आधुनिक तंत्रज्ञान घेऊन उभारला होता. शिवाय हे पूर्वीचे शेतकरी असल्याने पेट्रोरसायनाच्या क्षेत्रातील मराठी आणि इंग्रजी असे दोन्ही तंत्रज्ञान त्यांना अपरिचित आणि नवीन होते. शिवाय पेट्रोरसायनातील इंग्रजी शब्दांना मराठी शब्द उपलब्धही नव्हते. आणि काम करणारे अभियंते अनेक भाषक होते. त्यामुळे सगळे मराठी वापरणेही अशक्य होते. एक प्रसंग मला आठवतो आहे. एकस्चेंजर नावाचे रसायने थंड अथवा गरम करणारे एक उपकरण दाबाखालचे पाणी वापरून साफ करायचे होते. मी त्यासाठी माझ्या कामगारांना सूचना देत असताना माझ्यासमोर एक डच अभियंता बसला होता. मी त्या कामगारांना म्हणालो, एकस्चेंजर ए -1034 ची फ्लेन्ज खोल. २00 बार पाण्याने एकस्चेंजर साफ कर. मग तो कॉम्प्रेस्ड एअरने कोरडा कर. मग फ्लेन्ज बंद करून २५ बारला टेस्ट कर. हे शब्द त्या कामगारांना परिचित असल्याने त्यांना ते समजले आणि समोर बसलेला डच अभियंता मला म्हणाला, मलाही हे सारे समजले. कारण त्यातले कळीचे सगळे शब्द इंग्रजीतले होते. सगळी तंत्रभाषा मराठीत अट्टाहासाने आणली तर ती अनेकवेळा क्लिष्ट होते. त्यामुळे ती इंग्रजीतच वापरली तर सोयीचे जाते.
पेट्रोरसायन कारखान्यातील अभियांत्रिकीची भाषा
By admin | Published: June 18, 2017 12:11 AM