ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ९ - ' भाषेबद्दलचा अहंकार सोडून तिचा आदर करण्यास शिका. भाषेचा मुद्दा महत्वाचा की नागरिकांची सोय? असा सवाल विचारत संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
गुढी पाडव्यानिमित्त शुक्रवारी शिवाजी पार्कवर घेण्यात आलेल्या सभेत राज यांनी वैद्य यांच्यावर टीका केली होती. ' राज्याचे चार तुकडे करा म्हणतात. कोण ते मागो वैद्य? काय मागू ते मिळेल काय, म्हणे महाराष्ट्राचे चार तुकडे करणार. संघाने आधी गुजरातचे तुकडे करावेत, मग महाराष्ट्राचे बोलावे' अशा शब्दांत राज यांनी वैद्यांवर टीका करत संघाचा समाचार घेतला.
त्याच पार्श्वभूमीवर आज नागपूरमध्ये मा.गो.वैद्य यांनी राज यांना चार शब्द सुनावले. 'भाषेचा मुद्दा महत्वाचा की नागरिकांची सोय?' असा सवाल वैद्य यांनी विचारला. किमान ५० लाख लोकसंख्येचं राज्य निर्माण करा, नवीन राज्य पुनर्रचना आयोगाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राज्य वेगळे झाले तरी भाषा एकच असेल, असेही ते म्हणाले.