शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

भाषा माध्यम : शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक

By admin | Published: February 26, 2017 1:01 AM

लहान भाषिक अल्पसंख्याक समुदायांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देण्यात यावे, त्यासोबत प्रादेशिक भाषा शिकविण्यात यावी. एका बंजारा शिक्षकाने अनेक मराठी भाषेतील

- प्रा. संदीप चौधरी लहान भाषिक अल्पसंख्याक समुदायांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देण्यात यावे, त्यासोबत प्रादेशिक भाषा शिकविण्यात यावी. एका बंजारा शिक्षकाने अनेक मराठी भाषेतील कवितांचा विद्यार्थ्याकडून ‘गोर माटी’ मातृभाषेत अनुवाद करून घेतला. ही मातृभाषेतील शिक्षणाची अभिनव संकल्पना आहे.आश्रमशाळेतील आदिवासी मुले ही मराठी भाषेला भाषा माध्यम म्हणून अडचण समजतात, असे निरीक्षण अभ्यासकांनी नोंदविले आहे. अशा विद्यार्थ्यांनादेखील त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. अल्पसंख्य आदिवासींसाठी त्यांच्या मातृभाषेतील भाषा माध्यम असलेल्या प्राथमिक शाळा निर्माण व्हाव्यात.महाराष्ट्रातील उच्चशिक्षणाचे भाषा माध्यम हे ज्ञानशाखेनुसार भिन्नभिन्न आहे. कला, वाणिज्य या ज्ञानशाखांत प्रादेशिक भाषा मराठी भाषा, भाषा माध्यम आहे. काही ठिकाणी ऐच्छिक स्वरूपात इंग्रजी हे भाषा माध्यम आहे. प्रामुख्याने वाणिज्य शाखेसाठी इंग्रजी भाषा माध्यम बऱ्यापैकी लोकप्रिय आहे. विज्ञानशाखा, तंत्रज्ञान, वैद्यकीय आणि व्यवस्थापन शाखांचे भाषा माध्यम पूर्णत: इंग्रजी आहे. ज्ञानशाखेनुसार भाषा माध्यमाच्या विभागणीतील तर्क अनाकलनीय आहे. विज्ञानशाखा, तंत्रज्ञान, वैद्यकीय या ज्ञानशाखांचे अभ्यासक्रम हे संकल्पना आणि कृती वर्णनावर आधारित आहेत. म्हणून तेथे इंग्रजी भाषा माध्यम योग्य ठरते, असे अनेक विद्वानांचे मत आहे, शिवाय या ज्ञानशाखांमधील अनेक इंग्रजी संकल्पनांचे मराठीकरण एक तर अनुपलब्ध आहे किंवा अवघड तरी आहे, असा युक्तिवाद करण्यात येतो. तिसरा युक्तिवाद असा करण्यात येतो की, नव्वदच्या दशकानंतर मोठ्या प्रमाणावर इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्यामुळे उच्चशिक्षणही इंग्रजी भाषा माध्यमद्वारेच देण्यात यावे.या तिन्ही युक्तिवादांचा विचार करूनही मला असे सुचवावेसे वाटते की, महाराष्ट्रातील सर्व ज्ञानशाखांचे उच्चशिक्षणाचे भाषा माध्यम हे मराठीच असले पाहिजे. अर्थात, इंग्रजी मध्यमासोबत. कालानुरूप हेच योग्य आहे.भाषा हे मानवी समाजाचे प्रगत संवादाचे माध्यम आहे. समाजाचे आकलन करून घेण्याचे प्रभावी साधन आहे. भाषा समूहाला जोडण्याचे कार्य करीत असते. त्याचप्रमाणे, समाजाच्या विकासात योगदान देत असते. भाषेमुळेच व्यक्तीला नवीन ज्ञान कौशल्ये, सामाजिक व्यवहार आत्मसात करण्याची क्षमता प्राप्त होत असते. व्यक्ती बालपणापासूनच सामाजिक आंतरक्रियेद्वारे भाषा शिकत असते. भाषेमुळे उत्पादकता आणि सामाजिक एकात्मता वाढीस लागते. कारण उत्पादनशीलता, पुनर्वापर आणि प्रसार ही भाषेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. भाषा ही मानवी संस्कृतीचा अतुलनीय आविष्कार आहे. भाषेची व्यापकता ही फार मोठी असून, भाषेचा वापर केवळ संवाद माध्यम म्हणून मर्यादित नसून मनुष्यबळ विकासाचे साधन आहे. ती समूहाची अस्मिता जोपासते. विविध सामाजिक समूहातील भाषिक संपर्कामुळे भाषा ही सतत विकसित होत असते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे भाषेचा वारसा अव्याहतपणे हस्तांतरित होत असतो. प्रत्येक लोकसमूह आपल्या भाषेची जोपासना करत असतो. आपल्या दैनंदिन व्यवहाराचे माध्यम बनवीत असतो. संवाद, व्यापार, मनोरंजन, शिक्षण यासाठी भाषा माध्यम महत्त्वाची भूमिका बजावत असते. शिक्षण ही समाजाची एक उपव्यवस्था असून, शिक्षण आणि भाषा माध्यमाचा अतूट संबंध आहे. शिक्षण प्रक्रियेत भाषा माध्यमाचे विशेष स्थान आहे. किंबहुना, भाषा माध्यमावर शिक्षण प्रक्रिया अवलंबून असते, असेच म्हणावे लागेल. विशेषत: औपचारिक शिक्षण व्यवस्थेमध्ये भाषा माध्यमाला अनन्यसाधारण महत्त्व असते. अनौपचारिक शिक्षण व्यवस्थेमध्ये व्यक्तीच्या मातृभाषेला स्थान असते, परंतु औपचारिक शिक्षण प्रक्रियेमध्ये विविध स्तरावर भाषा माध्यम काय असावे, यावर तज्ज्ञांमध्ये सातत्याने वाद-संवाद होत असतो. प्रस्तुत लेखामध्ये भाषा माध्यमाचा समाजशास्त्रीय अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसमूहाची मातृभाषा, प्रादेशिक भाषा, ज्ञानभाषा, जागतिक भाषा आणि या सर्वांचे शिक्षणातील विविध टप्प्यांवरील महत्त्व आणि मर्यादा यांचा ऊहापोह येथे करण्यात आला आहे. भाषा हे समाजाला जोडण्याचे कार्य करते. त्याचप्रमाणे, भाषेमुळे सामाजिक भेद अथवा स्तरीकरण निर्माण होत असल्याचे प्राचीन सामाजिक इतिहासापासून अनेक दाखले देता येतील. शिक्षण प्रक्रियेत भाषा माध्यमाद्वारे सामाजिक स्तरीकरण झाल्याचे दिसून येते. पूर्वी संस्कृत ही प्रस्थापित वर्गाची भाषा होती. संख्येने अल्प असलेल्या लोकांची भाषा, परंतु प्रस्थापित वर्गाची भाषा म्हणून अध्यापनाची भाषा ही संस्कृत राहिली. संस्कृत येणारे ज्ञानी, विद्वान असे मानदंड तयार झाले. संस्कृत न येणारे अडाणी अशी भेदजनक व्यवस्था निर्माण झाली. शिक्षणातील भाषा माध्यमाचे सामाजिक अंतर निर्माण करणारे हे उत्तम उदाहरण ठरावे. भारतीय समाजव्यवस्था समजून घेण्यासाठी भाषा माध्यमाचे आकलन याचसाठी महत्त्वाचे ठरते.पुढे इंग्रजांचे भारतीय उपखंडात आक्रमण झाल्यानंतर, राज्यकर्त्यांची आणि व्यापाराची भाषा म्हणून इंग्रजीला महत्त्व आले. पर्यायाने इंग्रजी माध्यमाला महत्त्व आले. देशातील प्रस्थापित वर्गाने इंग्रजी आत्मसात केली. त्याचबरोबर, इंग्रजी येणारे आणि इंग्रजी न येणारे असे स्तर निर्माण झाले. शिक्षण व्यवस्थेचे माध्यम इंग्रजी झाले. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे यामध्ये भाषा माध्यम म्हणून इंग्रजीचा वापर सुरू झाला. मुळात औपचारिक शिक्षण व्यवस्था ही ब्रिटनमधील शिक्षण व्यवस्थेच्या प्रतिमानावर निर्माण करण्यात आली. कालांतराने संख्येने कमी, परंतु प्रस्थापित वर्गाची भाषा म्हणून इंग्रजीला भाषेमुळे सामाजिक अंतर निर्माण झाले. तिसरी महत्त्वाची भाषिक क्रांती म्हणजे संगणकाची भाषा होय. ९०च्या दशकात संगणक हाताळू शकणारे, डिजिटल भाषा आत्मसात केलेले आणि डिजिटल भाषा आत्मसात न केलेले असे दोन वर्ग निर्माण झाले. अगदी भारतात संगणक क्रांतीचा प्रसार होईपर्यंत एक प्रकारचे डिजिटल डिव्हाइडेड अर्थात, डिजिटल भाषेवरून सामाजिक ध्रुवीकरण झाले, परंतु जगतिकीकरणाच्या वावटळीतून कोणाचीही सुटका होऊ शकत नसल्यामुळे, डिजिटल भाषेमुळे होणारे सामाजिक अंतर कमी होण्यास मदत झाली. अलीकडच्या काळातील प्रभावी; व्यापक भाषा माध्यम म्हणून एका अर्थाने डिजिटल भाषा माध्यम महत्त्वाचे ठरत आहे. शिक्षण प्रक्रियेतील डिजिटल क्रांतीमुळे भाषा माध्यमाची संकल्पनाच बदलून गेली आहे. अगदी प्राथमिक शिक्षणापासून ते उच्चशिक्षणापर्यंत भाषा माध्यम म्हणून याकडे पाहायला हवे. थोडक्यात, भाषा माध्यम हे सामाजिक अंतर निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असते. शिक्षणातील भाषा माध्यमामुळे अनेक वेळा सामाजिक संघर्ष उद्भवताना दिसतो. निजामाच्या राजवटीत उर्दू भाषा माध्यमामुळे मराठी भाषिक मराठवाडा प्रदेशात मराठीची गळचेपी होत असे, तर कर्नाटकमध्ये बेळगाव या भागात मराठी भाषिक शाळांवर शासनातर्फे वक्रदृष्टी ठेवण्यात येत असल्याची तेथील मराठी भाषकांची तक्रार आहे. साधारणत: सत्ताधारी वर्ग हा त्याची भाषा ही भाषा माध्यम म्हणून लादत असतो. पूर्वी धर्मसंस्था प्रबळ असताना, धर्ममार्तंड त्यांची भाषा अर्थात, संस्कृत भाषा शिक्षण प्रक्रियेत भाषा माध्यम म्हणून उपयोगात आणत असत. इंग्रज सत्तेवर आल्यावर राजकीय वर्गाची इंग्रजी भाषा ही भाषा माध्यम झाली. परंतु जगतिकीकरण, लोकशाही शासनप्रणाली, लोककल्याणकारी राज्यव्यवस्था, शिक्षणाचा प्रसार, प्रसारमाध्यमे आणि परंपरागत व्यवसायांचे पतन, यामुळे शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे, भाषा माध्यमाद्वारे निर्माण होणारे सामाजिक अंतर कमी होण्यास मदत होत आहे. अनेकदा शिक्षणतज्ज्ञांकडून मातृभाषेतून शिक्षण देण्यात यावे, असा विचार मांडण्यात येतो. त्या वेळी त्यांना महाराष्ट्रापुरता विचार करता, मराठी भाषेतून शिक्षण असे म्हणायचे असते. त्याचबरोबर, इंग्रजी हे भाषा माध्यम नको असे त्यांना म्हणायचे असते, परंतु येथेही बाब लक्षात घेतली पाहिजे की, महाराष्ट्रातील सर्व नागरिकांची मातृभाषा ही मराठी आहे का? अर्थात, याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. महाराष्ट्रातील अल्प भाषिक अल्पसंख्याक समुदायाची मातृभाषा निश्चितच मराठी नाही. त्याचप्रमाणे, धार्मिक अल्पसंख्याकांची मातृभाषाही मराठी नाही. डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या विविध आदिवासी मातृभाषा तर अजिबात मराठी नाही. पावरा, गोंड, तडवी या आदिवासी समुदायांच्या मातृभाषा या मराठी भाषेपेक्षा वेगळ्या आहेत. मातृभाषा म्हणजे मातेकडून, आपल्या कुटुंबाकडून अथवा स्वत:च्या समूहाकडून आत्मसात करण्यात येणारी भाषा होय. या कसोटीनुसार उपरोक्त समुदायांची मातृभाषा ही मराठी भाषा ठरत नाही. एवढे मात्र निश्चितच की, मराठी भाषा ही महाराष्ट्रात संख्येने अधिक असलेल्या लोकांची मातृभाषा आहे, परंतु व्यापक अर्थाने पाहिले, तर ती एक प्रादेशिक भाषा आहे. महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे. मराठी भाषा माध्यम म्हणून शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे.