मुंबई - राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या पॅनेलने बाजी मारली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी आता राज्यात भाजपाची सत्ता आणणे हेच आमचे लक्ष्य असल्याचे विधान केले होते. त्यावरून आता राज्य सराकरमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नारायण राणे आणि भाजपाला टोला लगावला आहे.
नवाब मलिक म्हणाले की, नारायण राणे आणि भाजपाने काही जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकलेली नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २५ मते ५० मते असतात. आता अपहरण करणे, पैसे देणे आणि त्याच्यातून एखादी बँक जिंकल्यानंतर आाता ते राज्य जिंकण्याचं आव्हान देताहेत. हे म्हणजे गल्ली क्रिकेटमध्ये जिंकल्यानंतर वर्ल्डकप जिंकणार असं बोलण्यासारखं आहे. नारायण राणे हे अजित पवार कोण असं विचारताहेत. त्यांनी अजित पवारांना ओळखण्याची गजर नाही. संपूर्ण राज्य, देशाला अजित पवार कोण हे माहिती आहे. आता जिल्हा बँक जिंकल्यानंतर हे आम्ही महाराष्ट् जिंकू, सत्ता परिवर्तन करू असे दावे करताहेत. ठीक आहे भाजपवाले स्वप्न बघताहेत. आता त्यात आणखी एक व्यक्तीची भर पडली आहे. त्यांना शुभेच्छा, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.
दरम्यान, वादविवाद, मारहाण प्रकरण आणि कोर्टकचेरी यामुळे गाजलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत नारायण राणेंच्या नेतृत्वाखालील भाजपाने शिवसेनेला धोबीपछाड दिला होता. १९ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलला ११ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या खात्यात ८ जागा गेल्या.