मुंबई : मराठी विकिपीडियाच्या अधिकाधिक वापरामुळे मराठी भाषा अधिक सक्षम होईल, असे मराठी भाषा विकिपीडियासाठी काम करणारे तज्ज्ञ राहुल देशमुख यांनी सांगितले. ‘मराठी भाषा विकिपीडिया’ विषयावर आज मंत्रालयातील परिषद सभागृहात मराठी विकिपीडियासाठी काम करणारे तज्ज्ञ राहुल देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. १ ते १५ जानेवारी असा ‘मराठी भाषा पंधरवडा’ साजरा करण्यात येत असून, त्यानिमित्ताने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाला मराठी भाषेच्या उपसचिव अपर्णा गावडे, कक्ष अधिकारी नंदा राऊत यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. देशमुख म्हणाले की, विकिपीडिया एकाच वेळी ज्ञानशाखेतील विविध संज्ञांची माहिती तपशीलवार देते. आजही अनेकांना मराठीतून विकिपीडिया आहे हे माहीत नाही. पण ज्यांना माहीत आहे त्यांनी मराठी विकिपीडियासाठी अधिकाधिक योगदान देणे आवश्यक आहे जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचता येईल.रोज दीड हजार लोक मराठी विकिपीडियाच्या पहिल्या पेजला भेट देतात. यावरून मराठी विकिपीडियाला मिळत असलेला चांगला प्रतिसाद दिसतो.‘मुक्त ज्ञानकोश’ अशी सार्थ ओळख असणाऱ्या विकिपीडियावर आज ५00हून अधिक संदर्भ पुस्तके उपलब्ध आहेत. माहिती अधिक तंत्रज्ञान या संगमातून साकारलेले विकिपीडिया हे माध्यम आहे, असेही देशमुख यांनी या वेळी आपल्या व्याख्यानात सांगितले. मराठी विकिपीडियामार्फत राबविण्यात येणारे वेगवेगळे उपक्रम, याबाबतची माहिती राहुल देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या वेळी दिली. (प्रतिनिधी)
‘मराठी विकिपीडियाच्या वापराने भाषा सक्षम होईल’
By admin | Published: January 15, 2017 2:11 AM