पिरंगुट/पौड : मुळशीत भडकलेल्या टोळी युद्धाच्या पार्श्वभूमीवर येथील कोंढावळे गावातील एका घरातून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे़ विशेष म्हणजे हा साठा शिर्केवाडीत गणेश शिर्के व त्यांच्या कुटुंबावर २ जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्यातील आरोपी राजेंद्र गोपिनाथ शिर्के याच्या घरातून जप्त केला आहे़ त्यात २ रायफल बंदुका, १ एअर गन, ६ तलवारी आणि सुमारे १०० ते १२५ वेगवेगळी काडतुसे यांचा समावेश आहे़ तालुक्यातून इतका मोठा शस्त्रसाठा पौड पोलिसांनी जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे़ जमिनीच्या वादातून २ जानेवारी रोजी राजेंद्र्र शिर्के याने त्याची दोन मुले अमित शिर्के, रूपेश शिर्के, प्रसाद नाथ लिपाने, तुषार बाळासाहेब पवार, प्रीतम अरुण कोयले, श्रीकांत अरुण कोयले, कुणाल बाळासाहेब मसुडगे, गौरव सुहास कुलकर्णी, प्रफुल्ल प्रसन्न पिल्ले, अनिकेत अशोक भोसले, चैतन्य गोविंद निम्हण, राहुल ज्ञानोबा राऊत यांनी गणेश शिर्के यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला होता. या वेळी पौड पोलिसांनी पळून जात असलेल्या आरोपींना तातडीने अटक केली होती़ यातील मुख्य आरोपी राजेंद्र शिर्के यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर करून रिव्हॉल्वरचा परवाना मिळविल्याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे, तर राहुल राऊत व चेतन निम्हण यांच्यावर अमोल महेश जगताप याचा खून केल्याबद्दल खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सध्या दोघेही जामिन्यावर सुटले आहेत. तसेच अमित राजेंद्र शिर्के याच्यावरही भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. या सर्व आरोपींना ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून, ठार मारण्याच्या हेतूने मारहाण केल्याच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सारंगकर यांनी दिली. सहायक निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक श्रीमंंत भंगाळे, साहायक फौजदार प्रदीप फाजगे, सुनील वनवे, ए. आर. ननावरे, देविदास चाकणे, एस. जी. नगरे, मयूर निंबाळकर, उद्धव भालेराव, गणेश दाभाडे, मंगेश लांडगे, एन. एम. मदने, व्ही. व्ही. चौबे, एस. बी. कदम, एम. आर. माने, व्ही. एस. कांबळे यांनी कारवाई केली.(वार्ताहर)४मूळचे मुळशीचे असणाऱ्या अनेक जणांच्या टोळ्या सध्या पुणे शहर व परिसरात गुंडगिरी करीत असून, त्यांच्यातील स्पर्धा वाढत आहे़ त्यातून मुळशी तसेच पुणे शहरात गेल्या महिन्यात एकापाठोपाठ तीन खुनाच्या घटना घडल्या होत्या़ त्यातूनच गजा मारणे व त्याच्या टोळीविरुद्ध पुणे पोलिसांनी मोक्का कारवाई केली आहे़ ४राजेंद्र शिर्के याने आपल्याकडील तलवारीने रामचंद्र शिर्के यांच्या डोक्यावर वार केला होता़ त्यात तलवारीचा वार लागून त्यांचा हात मोडला आहे़ यातून शिर्के टोळीचा दहशत पसरविण्याचा हेतू दिसून येत आहे़ राजेंद्र शिर्के याच्याकडे शस्त्र परवाना असला, तरी त्याने तो बनावट कागदपत्राच्या साह्याने मिळविला आहे़ गणेश शिर्के यांच्या कुटुंबीयांना मारहाण करून परत जात असताना पौड पोलिसांनी त्यांना त्याच रात्री पकडले होते़ त्या वेळी त्यांच्या गाडीतून एक बंदूक व काही काडतुसे जप्त केली होती़ न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली त्यात आणखी एक बंदुक, १ एअर गन, ६ तलवारी आणि सुमारे सव्वाशे काडतुसे मिळाली आहेत़ इतका मोठा शस्त्रसाठा त्यांनी कशासाठी ठेवला होता, त्याचा वापर त्यांनी यापूर्वी कधी केला आहे का, याचा तपास करीत आहेत.- एऩ एम़ सारंगकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक