ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 19 - भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्यासाठी दोन टक्के या प्रमाणे सव्वा चार लाख रुपयांची लाच घेताना तापी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हणमंत सावंत (वय ४६ रा.गिरणा भवन, जळगाव) यास शेतक-यांच्या वकीलामार्फत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रात्री साडे आठ वाजता रंगेहाथ पकडले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील पाडळसे धरणात परिसरातील ११० शेतकºयांच्या जमिनींचे भूसंपादन झाले आहे. त्याची रक्कम मिळाल्यानंतर बाजार भावापेक्षा ही रक्कम कमी असल्याने शेतक-यांनी वाढीव मोबादल्यासाठी वकीलामार्फत न्यायालयात दावा दाखल केला होता.हा दावा शेतकरी जिंकले होते. त्याचे ३ कोटी १३ लाख रुपयांचे बील तापी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश सावंत यांच्याकडे सादर करण्यात आले होते. हे बील मंजूर करण्यासाठी सावंत यांनी दोन टक्के प्रमाणे ५ लाख २५ रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार एक लाख रुपये आधी देण्यात आले होते. उर्वरित सव्वा चार लाख रुपये बुधवारी देण्याचे ठरले होते. सायंकाळी सव्वा सहा वाजता ही रक्कम देण्याबाबत एकमत झाल्यानंतर वकीलांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
‘गिरणा’ या शासकीय निवासस्थानी रचला सापळा-
वकीलांच्या तक्रारीची खात्री केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक पराग सोनवणे यांनी रात्री आठ वाजताच सावंत यांच्या आकाशवाणी केंद्रा समोरील ‘गिरणा’ या शासकीय निवासस्थानी सापळा लावला. रात्री ८.२४ वाजता लाचेची रक्कम मोजताना सावंत यांना पथकाने रंगेहाथ पकडले.