पुणे : जनता वसाहतीतील अंगणवाडी 89 मध्ये मुलांना देण्यात येणा-या पोषण आहारात अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सोमवारी दुपारी एक वाजता हा प्रकार समोर आला. यामुळे अंगणवाड्यांमधील पोषण आहारावरप्रश्नचिन्ह उभे राहिले असून, मुलांच्या आरोग्याशी हा खेळण्याचा प्रकार असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. पालकांनी दत्तवाडी पोलिसांनी बोलावून घेत जेवणातील अळ्या दाखविल्या. त्या पाहून पोलीसही थक्क झाले.अंगणवाडीमधल्या मुलांना पोषण आहार देण्यात येतो. जनता वसाहतीमधील अंगणवाडीमधील कर्मचा-यांनी मुलांना दुपारच्या वेळेस पोषण आहार दिला. एका मुलाने भूक नव्हती म्हणून ते जेवण घरी नेले. त्यावेळी त्या मुलाच्या आजोबांना त्या जेवणामध्ये अळ्या असल्याचे दिसले. ते जेवण घेऊन त्यांनी अंगणवाडी गाठले. तिथे पोलिसांना बोलावून त्यांना अळ्या असलेले जेवण दाखविण्यात आले. दत्तवाडी पोलिसांनी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांना अंगणवाडीमध्ये बोलावून घेतले. जेवणाचे सँम्पल तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आले. त्याचा अहवाल आल्यानंतर चौकशी करून संबधितांवर गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती दत्तवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी दिली.
जनता वसाहतीतील अंगणवाडीतल्या पोषण आहारात आढळल्या अळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 9:04 PM