- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या ९ वर्षांपासून तपास यंत्रणांच्या रडारवर असलेला लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी सलीम मुकिम खानला, सोमवारी मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश (यूपी) एटीएसने संयुक्तरीत्या ही कारवाई केली आहे. नुकतीच अटक करण्यात आलेला आयएसआयचा हस्तक आफताब अलीला सलीम मुकिम खान परदेशातून सूचना देत पैसे पुरवीत होता. सलीम हा मूळचा उत्तर प्रदेशमधील फतेहपूर जिल्ह्यातील मंदीपूर गावातील रहिवासी आहे. त्याने २००७ साली मुझफ्फराबाद येथे दहशतवादी प्रशिक्षण घेतले होते. १ जानेवारी २००८ रोजी रामपूर सीआरपीएफ हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला दहशतवादी, कौसर आणि शरीफ यांनी सलीमने आपल्यासोबत मुझफ्फराबादेत प्रशिक्षण घेतल्याची माहिती दिली होती. त्यातील त्याचा सहभाग समोर येताच, २००८ पासून तो सुरक्षा यंत्रणांच्या रडावर होता. सलीमच्या दहशतवादी कारवायांमधील सहभागामुळे त्याच्याविरोधात लूकआउट नोटीस जारी करण्यात आली होती.यापूर्वी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएस यांनी केलेल्या संयुकत कारवाईत, फैजाबादमधून आयएसआयचा हस्तक आफताब अलीला अटक करण्यात आली होती. सलीम हा विदेशातून आफताबला सूचना देत होता. त्याच्या सांगण्यावरून आफताब पुढील सूत्रे हलवीत असे, तसेच आफताबला पैसे पुरविण्याचे कामही तो करत असल्याचे समोर आले. त्यानुसार, यूपी आणि महाराष्ट्र एटीएस सलीमच्या मागावर होती.महाराष्ट्र-यूपी एटीएसची संयुक्त कारवाईअरब एअरलाइन्सने सलीम पहाटे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर जुहू एटीएसच्या पथकाने त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली. सलीम उर्फ अबू अमर उर्फ आरिफ या नावाने तो वावरत होता. तपासात सलीम हा लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी असल्याचे उघड झाले. सध्या त्याचा ताबा उत्तर प्रदेश एटीएसने घेतला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.