लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याचा मंगळवार, २७ जून हा शेवटचा दिवस आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज भरता येणार आहेत. आतापर्यंत सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरल्याची माहिती शिक्षण उपसंचालक विभागाने दिली. मे महिन्याच्या सुरुवातीपासून अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची सुरुवात झाली होती. १३ जूनला दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर, शुक्रवार, १६ जूनपासून मोठ्या संख्येने अकरावीचे अर्ज २ भरायला सुरुवात झाली, पण अर्ज २ भरताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आल्यामुळे, २१ जूनला प्रक्रिया संपूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर, प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि पालकांचा तणाव कमी झाला होता. आता २७ जूनला ही प्रवेश प्रक्रिया बंद होणार आहे. त्यानंतर, ३० जूनला अकरावीची सर्वसाधारण यादी जाहीर करण्यात येईल. रविवारपर्यंत अर्ज १ चे २ लाख ४३ हजार अर्ज भरले गेले होते, तर अर्ज २ चे २ लाख १८ हजार भरले होते. सोमवारी २ ते ३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याचा अंदाज आहे. प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडल्याने, प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात कुठलाही बदल करण्यात आला नसल्याची माहिती शिक्षण विभागाचे उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली.
विद्यार्थ्यांसाठी अखेरची संधी
By admin | Published: June 27, 2017 2:27 AM