ऑनलाइन लोकमत
दर्यापूर, दि. 04 - जम्मू काश्मिरमधील कटरा ते वैष्णोदेवी मार्गावर तैनात असलेला सीआरपीएफचा जवान आणि तालुक्यातील डोंगरगावचा सुपुत्र शहीद गौतम इंगळेच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी १.४५ मिनिटांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. त्याला त्याचा मावसभाऊ गोलू बनसोड याने भडाग्नी दिला. रविवारी मध्यरात्री दरम्यान कटरा-वैष्णोदेवी मार्गावरील दरीत कोसळून त्याचा मृत्यू झाला होता. शहीद गौतम इंगळेला अखेरचा निरोप देण्याकरिता पंचक्रोशीतून नागरिक डोंगरगावात एकवटले होते. प्रचंड शोकाकूल वातावरणात त्याला शेवटचा निरोप देण्यात आला. मंगळवारी सकाळी साडेसात वाजता विमानाने गौतम इंगळेचे पार्थिवर नागपूर येथे पोहोचले. तेथून दुपारी साडेबारा वाजता सीआरपीएफच्या शासकीय वाहनातून त्याचा मृतदेह डोंगरगाव येथे आणण्यात आला. मृतदेह घरी पोहोचताच त्याच्या आई, पत्नीने एकच आक्रोश केला. नातेवाईकांचा व गावकऱ्यांचा शोकदेखील अनावर झाला होता. सगळे गाव शोकसागरात बुडाले होते. आपल्या लाडक्या गौतमचे कलेवर पाहून वीरमाता रत्नाबार्इंनी हंबरडा फोडला. त्यांची स्थिती पाहून सारे गाव गहिवरले होते. पत्नीचा आक्रोशही हृदय हेलावणारा होता. गावात पोहोचताच अवघ्या १५ ते २० मिनिटातच तिरंग्यात लपेटलेल्या शहीद गौतमची अंत्ययात्रा निघाली. त्यावेळी गौतम इंगळे अमर रहे, भारत माता की जयच्या घोेषणांनी आसमंत दणाणला होता. यावेळी पंचक्रोशीतील हजारो नागरिकांची उपस्थिती होती. १.४५ मिनिटांनी बौद्ध भिख्खू भदंत महास्थवीर ज्ञानज्योती, भदन्त जैरत्न बोधींसह अन्य भिख्खू गणांनी बौद्ध धर्माच्या परंपरेला अनुसरून बुद्धवंदना तसेच पूजापाठ करून शहीद गौतमला श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यसंस्कारासाठी महसूल विभागाने चंडिकापूर-डोंगरगाव मार्गावर गावालगतच्या ई-क्लास जमिनीवर दहा बाय दहाचा चौथरा तयार करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, आ.रमेश बुंदिले, माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, तहसीलदार राहुल तायडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी उपस्थित राहून शहीद गौतमला श्रद्धांजली अर्पण केली. नवनीत राणा यांनी शहीद गौतमच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. बंदुकीच्या ३ फैरी झाडून मानवंदनाशहीद गौतम इंगळे यांना सीआरपीएफ तसेच पोलिसांतर्फे शासकीय इतमामात बंदुकीच्या ३ फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. गौतम इंगळेला अंतिम निरोप देण्याकरिता परिसरातील अनेक मान्यवरांसह भाजपचे बाळासाहेब वानखडे, मदन बायस्कार, सुभाष हरणे, काँग्रेसचे सुधाकर पाटील, सुनील गावंडे, संजय बेलोकार, अभिजित देवके, सुनील डिके, रवी गणोरकर, बाजार समितीचे बाबाराव बरवट, भय्या बरवट, सरपंच छाया आठवले, पंचायत समिती सभापती रेखा वाकपांजर, गटविकास अधिकारी अरविंद गुडधे, उपसभापती संजय देशमुख, संतोष महात्मे, रामेश्वर अभ्यंकर, प्रताप अभ्यंकर, भूषण बनसोड आदींची उपस्थिती होती.