अकोला : अल्प पावसाची झळ खरिपाप्रमाणे रबी हंगामाला बसली असून, आतापर्यंत राज्यात ५५ टक्क्यांपेक्षा जास्त पेरणी झाली आहे. राज्यातील आठ विभागांत शेतकऱ्यांनी विविध रबी पिकांची पेरणी केली आहे. ही पेरणी आता अंतिम टप्प्यात आहे, पण संरक्षित ओलितासाठी असलेले अल्प पाणी आणि जमिनीत ओलावा नसल्याने उत्पादनाची शाश्वती शेतकऱ्यांना कमीच वाटत आहे. यावर्षीचा खरीप हंगाम हातचा गेल्याने रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची भिस्त होती; परंतु परतीच्या पावसानेही दगा दिल्याने रब्बी हंगामातील उत्पादनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तथापि, कोरडे शेत ठेवून करायचे काय, म्हणून शेतकऱ्यांनी छातीवर दगड ठेवून रब्बीची पेरणी केली आहेत. राज्यातील रब्बीचे क्षेत्र ६२ लाख ४३ हजार हेक्टर आहे. यात कोकण विभागातील ०.३४ लाख हेक्टरपैकी गत आठवड्यापर्यंत ०.००६ लाख हेक्टर म्हणजेच सरासरी क्षेत्राशी तुलना केल्यास केवळ दोन टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती.या विभागात भात कापणी झालेल्या क्षेत्रावर रब्बीची तयारी सुरू असून,आतापर्यंत दोन टक्क्यांच्या वर पेरणीचा आकडा अगदी थोडा वाढला आहे. नाशिक विभागात रब्बीचे सरासरी ४.१५ लाख हेक्टर क्षेत्र असून, गत आठवड्यापर्यंत १.१६ लाख हेक्टर २८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली.या आठवड्यात कालव्याचे पाणी सोडणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने पेरणीत थोडी वाढ झाली आहे. पुणे विभागातील रब्बीचे २२.०१ लाख सरासरी क्षेत्र आहे. मागील आठवड्यात १२.५३ लाख हेक्टर म्हणजे ५७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामध्ये या आठवड्यात भर पडली आहे. कोल्हापूर विभागात ५.०९ लाख हेक्टर रब्बीचे क्षेत्र आहे. त्यापैकी ३.१९ लाख हेक्टर ६३ टक्के पेरणी झाली आहे. औरंगाबाद विभागातील ८.६३ लाख हेक्टरपैकी ५.५६ लाख म्हणजेच ६४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. यात या आठवड्यात थोडीशी वाढ झाली आहे. लातूर विभागातील १२.१४ लाखपैकी ७.४० लाख हेक्टर (६१ टक्के) पेरणी झाली आहे.अमरावती विभागातील ५.९३ लाख हेक्टरपैकी ३ लाख ६७ हजार ५०० हेक्टर (६२ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नागपूर विभागातील ४.१३ लाख हेक्टरपैकी ०.५० लाख हेक्टरवर (१२ टक्के) पेरणी झाली होती. यात अल्पशी वाढ झाली आहे.
राज्यात रबीची पेरणी अंतिम टप्प्यात !
By admin | Published: December 03, 2015 1:36 AM