ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 1 - जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे हिमस्खलनात शहीद झालेले कवठेमहांकाळ तालुक्यातील रामपूरवाडी येथील जवान रामचंद्र शामराव माने यांच्यावर बुधवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने सकाळी साडेआठच्या दरम्यान कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर माने यांचे पार्थिव आणण्यात आले.
तेथून त्यांच्या गावी रामपूरवाडीला साडेनऊ वाजता नेण्यात आले. गावात रस्त्याच्या अंत्ययात्रेच्या मार्गावर दुतर्फा रांगोळी काढून फुले टाकण्यात आली होती. माने यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात आले. तेथे त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना शोक अनावर झाला होता. आई सुलाबाई, पत्नी सुनीता, मुले संकेत, राहुल, भाऊ भानुदास, अनिल यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
सकाळी दहा वाजता माने यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी गावाबाहेर शेतात नेण्यात आले. सेनादलाने बंदुकीच्या तीन फैरी झाडत त्यांना मानवंदना दिली. माने यांचा मोठा मुलगा संकेत (वय ९) याने त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. माने यांच्या अंत्यविधीवेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुमनताई पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे उपस्थित होते. माने यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय जमला होता.
जवान रामचंद्र माने जम्मू काश्मीरच्या मच्छिल भागात झालेल्या हिमस्खलनात शहीद झाले. रामचंद्र माने हे गस्त घालत असताना हिमस्खलनची दुर्घटना घडली आणि त्यामध्ये ते गाडले जाऊन त्यांचा मृत्यू झाला. ते बीएसएफमध्ये कार्यरत होते. हिमस्खलन झाल्यानंतर 5 जवान यामध्ये गाडले गेले. ज्यात महाराष्ट्राच्या तीन जवानांचा समावेश होता. मच्छिल भागातील हवामान आणि योग्य ती वैद्यकीय मदत मिळू न शकल्यामुळे पाचही जणांचा मृत्यू झाला.