मुंबई : मुंबई पोलीस दलात अनुकंपा तत्त्वावर नेमलेल्या एका महिला लिपिक-टंकलेखिकेने ठराविक मुदतीत मराठी टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण केली नाही म्हणून तिला नोकरीतून काढून टाकण्याचा पोलीस आयुक्तांचा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) रद्द केला. तिला १ जानेवारीपूर्वी पुन्हा कामावर रुजू करून घेण्याचा आदेश दिला आहे.‘मॅट’चे उपाध्यक्ष राजीव अगरवाल आणि न्यायिक सदस्य आर. बी. मलिक यांनी दिलेल्या या निकालाने प्रियंका जयंत शिंदे या मुलीला न्याय मिळाला आहे. ८ जून २०११ रोजी तिला नोकरीतून काढून टाकले गेले होते. पोलीस सेवेत असलेल्या वडिलांच्या मृत्यूमुळे प्रियंका हिला मध्य परिमंडळ कार्यालयात ८ मे २००९ रोजी लिपिक-टंकलेखक या पदावर अनुकंपा तत्त्वावर नेमणूक दिली गेली. नोकरीस लागण्यापूर्वी ती ‘एमएस-सीआयटी’ परीक्षा उत्तीर्ण झाली होती. त्यामुळे नियमानुसार तिने नोकरीस लागल्यानंतर दोन वर्षांत म्हणजे ७ मे २०११ पर्यंत प्रति मिनिट ३० शब्दांच्या मराठी टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. परंतु प्रियंका ही परीक्षा ठरलेल्या मुदतीत दे देऊ शकली नाही. बडतर्फीचा आदेश ८ जून रोजी निघण्याच्या दोन आठवडे आधी २६ मे रोजी तिने ही परीक्षा दिली व त्याचा निकाल बडतफीर्नंतर २३ जुलैला लागून ती ६५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. अशा परिस्थितीत या मुलीला नोकरीतून काढणे अन्यायाचे आहे, असे म्हणून न्यायाधिकरणाने तिला पुन्हा कामावर घेण्याचा आदेश दिला. (विशेष प्रतिनिधी)
अखेर गेलेली नोकरी पुन्हा मिळाली!
By admin | Published: December 24, 2014 2:44 AM