ठाणे : यंदा राज्यात ३० मे ते ५ जूनदरम्यान जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या वर्षीपेक्षा ३१.३ टक्के अधिक पाऊस विदर्भात, तर २८.२ टक्के पाऊस मध्य महाराष्ट्रात पडेल, असा अंदाज आहे. त्याखालोखाल कोकणात २७.५ टक्के, तर मराठवाड्यात २४.९ टक्के पाऊस पडेल आणि दुष्काळाच्या छायेतील महाराष्ट्राला दिलासा मिळेल, अशी चिन्हे असल्याचे मान्सूनच्या पूर्वानुमानात नमूद करण्यात आले आहे. राज्यातील पावसाची सरासरी यंदा गाठली जाईल असे नव्हे, तर साधारण १०६ टक्के इतके प्रमाण गाठले जाईल, असेही या निष्कर्षात म्हटले आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारीच्या आढाव्यावेळी प्रादेशिक हवामान खात्याचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी आपल्या सादरीकरणात हा तपशील दिला आहे. > आयआयटीएम आणि हवामान खाते एकत्रया मान्सून पूर्वानुमानाचा वापर आपत्कालीन व्यवस्थापन, हवामान परिवर्तनशीलतेचे अनुकूल परिणाम, पीक नियोजन आणि पाणी व्यवस्थापनासाठी केला जातो. मान्सूनदरम्यान विजांचा कडकडाट, वीज पडणे, त्यातून होणारे आणि पावसाने होणारे नुकसान टाळण्यासाठी अभ्यास करणे आणि त्यावरील संशोधन याची जबाबदारी पुण्यातील आयआयटीएम आणि भारतीय हवामान खाते एकत्रितरीत्या पार पाडते आहे. त्याचा तपशीलही या आपत्कालीन नियोजनाच्या बैठकीत देण्यात आला. त्या माहितीचा वापर करून आपत्कालीन प्रसंगांचे पूर्वनियोजन करणे, त्यासाठी विविध यंत्रणांचा समन्वय साधणे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मदत होऊ शकते, याचाही ऊहापोह या बैठकीत करण्यात आला. >केरळमध्ये पाऊस वेळेत दाखल होईल. पण, महाराष्ट्रात ३० मेपासूनच वळवाचे आगमन होईल व राज्यात सर्वत्र त्याचे आगमन ठरल्यावेळी होईल, असा दिलासादायक अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. > मार्चच्या हवामानाच्या स्थितीवरून जून ते सप्टेंबर या महिन्यांतील पावसाच्या टक्केवारीचा अंदाज पुण्याच्या आयआयटीएम व सीएफएसच्या प्रायोगिक मानकांवर आधारित आहे. त्यांनी याआधी वर्तवलेला पावसाचा अंदाज जवळजवळ खरा ठरला आहे.
मेच्या अखेरपासूनच बरसणार सरी!
By admin | Published: May 13, 2016 5:04 AM