- जयंत धुळप
अलिबाग - देशभरात गाजलेल्या रामदास बोट जलसमाधी दुर्घटनेतून वयाच्या 10 व्या वर्षी समुद्राच्या खळाळत्या लाटांवर स्वार होत किनारा गाठून मोठ्या धाडसाने बचावलेले अलिबाग कोळीवाड्यातील विश्वनाथ तथा बारक्याशेठ मुकादम यांचे शनिवारी सकाळी वयाच्या 91 वर्षी त्यांच्या राहात्या घरीच निधन झाले.
ब्रिटीश अधिकाऱ्यांकडून मुकादम यांच्या धाडसाचे कौतुक
15 ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीदिनाच्या केवळ 29 दिवस आधी 17 जूलै 1947 रोजी गटारी अमावास्येच्या दिवशी रामदास बोट दुर्घटनाग्रस्त झाली होती. सकाळी आठ वाजता भाऊचा धक्का(मुंबई) येथून निघून रेवस(अलिबाग) बंदरात तब्बल 700 प्रवाशांना घेवून येणारी रामदास बोट काशाच्या खडकाजवळ वातावरणात अचानक बदल होवून निर्माण झालेल्या मोठय़ा समुद्र लाटांच्या माऱ्या ने बुडाली होती. त्या बोटीत असलेल्या 700 प्रवाशांपैकी केवळ 60 प्रवासी वाचू शकले होते तर तब्बल 640 प्रवाशांचा बुडून मृत्यू झाला होता. याच भीषण परिस्थितीला मोठ्या जिद्दीसह धाडसाने सामोरे जावून त्यावेळी केवळ 10 वर्षाचे असणारे बारक्याशेठ मुकादम चमत्कारिकरीत्या वाचले होते. बारक्याशेट यांनी तब्बल 22 तास खवळलेल्या समुद्रात पोहत किनारा गाठून आपला जीव वाचवला होता. त्यांच्या या धाडसाचे त्यावेळी कौतुक करुन तत्कालीन ब्रिटीश अधिकाऱ्यांनी त्यांचा गौरव देखील केला होता.
रामदास बोट दुर्घटनेच्या अलिबागच्या अखेरच्या साक्षादाराच्या जीवनास पूर्णविराम
बारक्याशेठ मुकादम यांच्या निधनामुळे रामदास बोट दुर्घटनेचा ईतिहास सांगू शकणाऱ्या अलिबागमधील अखेरच्या साक्षीदाराच्या जीवनपर्वास आज पूर्णविराम मिळाला आहे. स्व.मुकादम यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना-जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. अलिबाग कोळीवाडय़ातील मेटपाडा स्मशानभूमीत त्याच्यावर दूपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी अलिबाग शहरवासीच्यावतीने स्व.मुकादम यांना श्रद्धाजली व्यक्त केली. अंतयात्रेत अलिबाग व परिसरातील अनेक मान्यवर मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.