लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारने अखेर पंतप्रधान खरीप विमा योजनेतील ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीचे १,९२७ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या तीन दिवसांत ही रक्कम नुकसानभरपाईसाठी दावा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.. यामुळे नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा व चंद्रपूर या सहा जिल्ह्यांमधील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
या सहाही जिल्ह्यांमध्ये नुकसानभरपाईचे दावे ११० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने बीड पॅटर्ननुसार अतिरिक्त रक्कम राज्य सरकारने देणे आवश्यक होते. त्यासाठी शेतकऱ्यांकडून तसेच कृषी विभागाकडूनही राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. पीकविमा हप्त्याच्या ११० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानभरपाई असल्यास त्या ठिकाणी ११० टक्क्यांपर्यंत नुकसानभरपाई विमा कंपनी भरते व त्यापुढील नुकसानभरपाई राज्य सरकार देते. या तत्त्वानुसार गेल्या खरीप हंगामातील मंजूर ७ हजार ६२१ कोटी रुपयांपैकी विमा कंपन्यांमार्फत ५ हजार ४६९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली होते. उर्वरित शिल्लक नुकसानभरपाईपैकी १ हजार ९२७ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचे वाटप प्रलंबित होते.
जिल्हा आणि विम्याची रक्कम (कोटीमध्ये) नाशिक ६५६ जळगाव ४७० नगर ७१३ सातारा २७.७३ चंद्रपूर ५८.९० सोलापूर २.६६
ही रक्कम येत्या तीन दिवसांत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येत आहे.- विनयकुमार आवटे, संचालक, कृषी, पुणे