ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ९ - सुप्रीम कोर्टातून दिलासा न मिळाल्याने कॅम्पा कोलातील बेकायदेशीर घरांवर हातोडा पडणार हे स्पष्ट झाले असतानाच आता या रहिवाशांच्या बाजूने गानसम्राज्ञी लता मंगेशकरही मैदानात उतरल्या आहेत. 'बिल्डराच्या चुकीची शिक्षा रहिवाशांना नको' असे विधान लता मंगेशकर यांनी केले आहे.
वरळीतील कॅम्पा कोला या इमारतीतील बेकायदेशीर मजल्यांवर लवकरच मुंबई महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर लता मंगेशकर यांनी ट्विटरद्वारे कॅम्पा कोलाच्या रहिवाशांना पाठिंबा दर्शवला आहे. ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये लतादिदी म्हणतात, कॅम्पा कंपाऊंड प्रकरणात राज्य सरकारचे लक्ष वेधू इच्छिते. बेकायदेशीर मजले पाडल्यास इमारतीतील हजारो रहिवासी बेघर होतील. या धक्क्यामुळे आजपर्यंत तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. बिल्डरांच्या चुकीची शिक्षा सर्वसामान्य नागरिकांना द्यावी हे अन्यायकारक असल्याचे लतादिदींनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षभरापासून कॅम्पा कोलाप्रकरणी राज्य सरकारवर दबाव वाढत आहे. आता थेट लता मंगेशकर यांनीच रहिवाशांना पाठिंबा दर्शवल्याने सरकार यासाठी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.