नागपूर : ‘सेलिब्रिटी ट्वीट’बाबत लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या मान्यवरांच्या चौकशीचा प्रश्नच नव्हता. मी जो आदेश दिला, तो केवळ भाजप आयटी सेलसाठी होता. प्राथमिक चौकशीत भाजपचे आयटी सेल प्रमुख व १२ ‘इन्फ्लुएन्सर’ची नावे समोर आली आहेत, असा खळबळजनक खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. सोमवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.‘सेलिब्रिटी ट्वीट’ प्रकरणात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. जे ट्वीट आले, त्याबाबत भाजपच्या आयटी सेलची चौकशी करू, असे मी सांगितले होते. मात्र, माझ्या तोंडी लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांची चौकशी करू, असे टाकण्यात आले. या प्रकरणात भाजपशी संबंधित लोक जुळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
पूजा चव्हाण प्रकरणात नियमानुसार चौकशी सुरूपूजा चव्हाणच्या मृत्यूवरून राजकारण तापले असताना, या प्रकरणात नियमानुसारच चौकशी सुरू असल्याची भूमिका त्यांनी मांडली. या प्रकरणात पोलिसांवर कुणाचाही दबाव नाही. नियमानुसारच चौकशी होईल व त्यानंतर जे काही समोर येईल त्याच्या आधारावर सरकार पुढील पावले उचलेल. या प्रकरणात चौकशी होणार, हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितले आहे. पुणे पोलीस योग्य तपास करीत आहेत. विरोधकांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असेही देशमुख यांनी सांगितले.