मुंबई : शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील स्वयंपाकघर बंद करण्यात आले असून, इस्कॉन मंदिरातर्फे रुग्णांसाठी अन्न दिले जाते. जुहू येथून जेवण शिवडीला येण्यास दोन ते तीन तासांचा विलंब होतो. त्यामुळे रुग्णांचे वेळापत्रक पार कोलमडले आहे. आता पावसाळ्यात जेवण रुग्णालयात पोहोचेल की नाही, अशी भीती रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. क्षयरोग रुग्णांना औषधाबरोबर सकस आणि वेळच्या वेळी आहार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. क्षयरोगावर मात करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती चांगली राखणे आवश्यक असते. त्यामुळे औषधांच्या आणि जेवणाच्या वेळा पाळा, असा सल्ला डॉक्टर क्षयरोग रुग्णांना आवर्जून देतात, पण आता क्षयरोग रुग्णालयातच रुग्णांना विलंबाने जेवण मिळत आहे. स्वयंपाक जेव्हा रुग्णालयातच व्हायचा, तेव्हा रुग्णांना सकाळी साडेअकराला आणि सायंकाळी साडेपाचला जेवण मिळायचे. आता मात्र, दुपारचे जेवण साडेबारा - १ वाजता तर रात्रीचे जेवण साडेआठ वाजता देण्यात येते. त्यामुळे कामगारांचे वेळापत्रकही कोलमडले आहे. रात्रपाळीला कमी कर्मचारी असतात. त्यामुळे डबे घासणे, पाठवणे ही कामे ते करत राहिल्यास, अन्य कामांवर परिणाम होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जेवणाच्या गाड्या सकाळी साडेअकरा, पावणेबाराच्या सुमारास रुग्णालयात येतात आणि रात्री साडेसात, आठच्या सुमारास येतात. त्यानंतर, या गाड्यांमधून जेवण काढले जाते आणि मग रुग्णांना जेवणाचे वाटप करण्यात येते. आता पावसाला सुरुवात होईल. त्या वेळी रुग्णांना वेळेवर जेवण मिळावे, यासाठी रुग्णालय प्रशासनाने इस्कॉन मंदिराबरोबर बैठक घेतली. या बैठकीत पावसाळ्यात जास्त पाऊस झाला, पाणी तुंबले, तरीही वेळेत जेवणाची गाडी रुग्णालयात पोहोचली पाहिजे, असे सांगण्यात आले आहे. कारण इस्कॉनमधून जेवणाची गाडी न आल्यास, रुग्णालयाकडे रुग्णांना जेवण देण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात जेवणाचे वेळापत्रक कोलमडणार नाही, याची विशेष काळजी घेण्याची सूचना रुग्णालयाकडून इस्कॉन मंदिराला देण्यात आली आहे. मधुमेही रूग्णांच्या इन्सुलिनच्या वेळा ठरलेल्या असतात. त्यामुळे जेवण त्यांना उशिरा मिळाल्याने त्रास होऊ शकतो, असे एका डॉक्टरांकडून समजले. (प्रतिनिधी)>‘कूपर’मध्ये शिजते जेवणक्षयरोग रुग्णालयात सर्वसाधारणपणे ५०० रुग्ण दाखल असतात.क्षयरोग रुग्णालयासाठी लागणारे जेवण इस्कॉन मंदिरातर्फे कूपर रुग्णालयात शिजविण्यात येते. प्रत्येक रुग्णाच्या एका वेळच्या जेवणासाठी ८५ रु. आकारले जातात.
क्षयरुग्णांना उशिरा जेवण
By admin | Published: June 13, 2016 2:42 AM