ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - तरुणाकडे असलेली लेदरची बॅग गाईच्या कातडीची असल्याच्या संशयावरुन एका स्वयंघोषित गोरक्षक रिक्षाचालकाने त्याला दमदाटी केल्याची कहाणी खरी नसून त्या तरुणानेच रचली होती, अशी धक्कादायक आणि तितकीच गंभीर माहिती समोर आली आहे. बरुण कश्यप असे या तरुणाचे नाव आहे. फक्त आणि फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि ऑफिसला पोहोचण्यासाठी उशीर झाल्याने त्याने यासंदर्भातील माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली होती. मात्र त्याचे हे ढोंग पोलिसांमुळे अखेर उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून लवकरच त्याला अटक करण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये ही घटना घडली होती.
मुळचा आसामचा असलेला बरुण कश्यप हा अंधेरीतील एका खासगी कंपनीमध्ये काम करतो. ऑगस्ट महिन्यात,ऑफिसला जाताना रिक्षाचालकाने त्याच्याजवळ असलेली लेदर बॅग ही गाईच्या कातडीपासून बनवलेली आहे, असा संशय व्यक्त करत त्याला त्रास द्यायला सुरुवात केली. यानंतर एका ठिकाणी रिक्षा थांबवून त्याला दमदाटी केली, अशी खोटी तक्रार बरुणने पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. बरुणच्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. अंधेरीत ही घटना घडल्याने पोलिसांनी अंबोली,ओशिवरा आणि डीएन नगर परिसरातील 49 रिक्षाचालकांची चौकशी केली.
बरुणने सांगितलेल्या वर्णनानुसार रिक्षाचालकाचे स्केच रेखाटून जारी देखील केले. मात्र बरूणने सांगितल्याप्रमाणे कोणतीच माहिती समोर येत नव्हती. अखेर तपासादरम्यान बरुणने रचलेला डाव पोलिसांसमोर उघड झाला. त्याने दिलेला रिक्षाचा नंबरदेखील दुस-याच वाहनाचा असल्याचे समोर आले. त्याच्या कॉल रेकॉर्डवरुन ज्याठिकाणी ही घटना घडल्याचा दावा त्याने केला होता, तेव्हा बरुण प्रत्यक्षात घरातच होता, ही बाब निष्पन्न झाली. यानंतर, पोलिसी खाक्या दाखवतच बरुणने स्वतःची चूक कबुल केली.