दीपक भातुसेमुंबई : राज्य लोकसेवा आयोगातर्फे ८ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२२ चा निकाल तब्बल दहा महिने उशिरा लागल्याने हजारो उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.
या काळात इतर परीक्षांमध्ये पात्र ठरलेले आणि विविध पदांवर नियुक्ती मिळालेले उमेदवारही पात्र ठरले आहेत. त्यामुळे उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या या निकालात कट ऑफ वाढला असून, अत्यंत कमी फरकाने हजारो विद्यार्थी अपात्र ठरत आहेत. त्यामुळे एमपीएससीने विविध पदांवर नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांना या निकालातून वगळून पुन्हा निकाल जाहीर करावा, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.
कोरोना काळापासून आतापर्यंत परीक्षा वेळेवर न झाल्याने तसेच योग्यवेळी निकाल न लागल्याने साधारणतः दीड हजारच्या आसपास विविध पदांवर नियुक्तीस पात्र ठरलेले उमेदवार पुन्हा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ ला पात्र ठरले आहेत. यापूर्वीच्या गट ब पूर्व परीक्षेमध्ये विविध पदांसाठी २२ पट पर्यंत उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र करण्यात आले आहेत. याउलट संयुक्त गट ब परीक्षा २०२२ पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेसाठी केवळ १६.६४ पटच उमेदवार पात्र करण्यात आले आहेत.
योग्य वेळी निकाल लागला असता, तर ही परिस्थिती ओढवली नसती. २० पट ऐवजी १६.६४ पट प्रमाणात उमेदवार पात्र केल्याने हजारो उमेदवार पूर्व परीक्षा निकालामध्ये ०.५ ते २.० इतक्या कमी गुणांनी अपात्र ठरत आहेत. अपात्र उमेदवार नैराश्येत गेले आहेत. - महेश घरबुडे, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती