Dhananjay Deshmukh News: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर लावून धरली आहे. यावरून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला. यानंतर आता मृत संतोष देशमुख यांचे कुटुंब भगवान गडावर जाणार आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी याबाबत माहिती दिली.
पत्रकारांशी बोलताना धनंजय देशमुख यांनी सांगितले की, बाबा म्हणाले की, या हत्येतील जे आरोपी आहेत, त्या आरोपीची मानसिकता खराब झाली. पण ही सगळी अपुरी माहिती आहे. त्यांच्याकडे सगळी माहिती नसल्यामुळे ते असे म्हणाले. खरी माहिती अशी आहे की, मस्साजोग येथील अवादाच्या प्लांटवर खंडणीसाठी ते सगळे आरोपी आले होते. त्यांनी आमच्या गावातील दलित बांधवाला मारहाण केली. काठ्यांनी मारले. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आहे. हा पुरावा त्यांना दाखवणार आहोत, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.
आमची लेकरे पोरकी झाली, आमचा भाऊ परत कुठून आणायचा
अशा प्रकारे हल्ला झाल्यावर दलित बांधवांनी आरोपींना मारहाण न करता लोकप्रतिनिधी संतोष अण्णा देशमुख यांना कॉल केला. संतोष अण्णा तिथे गेल्यावर त्यांच्याबाबतीतही तेच करण्यात आले. त्यांनाही मारहाण करण्यात आली. मग ते गावात आले, तिथेही खंडणी मागायला लागले. गावकरी आणि त्यांच्यातही बाचाबाची झाली. झटापट झाली. त्यांची मानसिकता काय होती, त्यापेक्षा एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगतो की, त्यांच्यावर गुन्हे किती होते, हे बहुतेक कोणी पाहिलेले नाही. हत्या केलेल्या आरोपींवर किती गुन्हे आहेत, त्याचीही ओरिजिनल कॉपी आम्ही गडावर घेऊन जाणार आहोत. महाराजांना ते दाखवणार आहे. आरोपी हे आरोपी आहेत. त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत. पण मला एक अपेक्षा होती की, आज माझ्या कुटुंबाची काय मानसिकता आहे. आमची लेकरे पोरकी झाली. माझा भाऊ गेला. लहान लेकरे आहेत, आई-वडील आहेत, ते म्हातारे आहेत. आता आम्ही काय करायचे, आमचा भाऊ परत कुठून आणायचा, असा सवाल धनंजय देशमुख यांनी केला.
दरम्यान, तुम्ही म्हणाला असता की स्वतःला शिक्षा करून घ्या, तर तेही आम्ही केले असते. आरोपीबाबत अतिशय चुकीच्या पद्धतीने गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. योग्य माहिती आमच्याकडे आहे. आम्ही येत्या रविवारी भगवान गडावर महंत नामदेवशास्त्री यांची भेट घेणार आहोत. सगळे पुरावे घेऊन जाणार आहोत. त्यांच्यासमोर ठेवणार आहोत आणि त्यांच्याकडे न्याय मागणार आहोत, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली.