ऑनलाइन लोकमतलोणार (बुलडाणा), दि. 12 - शाळेत येण्यास उशीर झाल्याच्या कारणावरुन मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांकडून शाळेतील शौचालयाची स्वच्छता करुन घेतल्याचा खळबळदायक प्रकार शहरातील नगर पालिकेच्या काटे नगरातील उर्दू पुर्व माध्यमिक शाळेत १२ आॅक्टोबर रोजी घडला. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी मुख्याध्यापकाची तक्रार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.स्थानिक नगर पालिकेच्या उर्दु पूर्व माध्यमिक शाळेच्या इयत्ता ७ वी शिक्षण घेणाारा शे.रेहान शे.उस्मान या विद्यार्थ्यास काही कारणास्तव शाळेत येण्यास उशीर झाला. शाळेत पोहोचला त्यावेळी राष्ट्रगित सुरु असल्याने शे.रिहान हा फाटकाबाहेर थांबला. राष्ट्रगित संपल्यानंतर शे.रेहान याने शाळेत प्रवेश करताच शाळेचे मुख्याध्यापक मुजाहिद यांनी शे.रेहानलाथांबण्यास सांगून शाळेत उशीरा येण्याचे कारण विचारले. उशीरा आल्याबद्दल रेहानकडून शाळेतील शौचालय व्यक्तीश उभे राहून स्वच्छ करुन घेतले. सदर प्रकार विद्यार्थ्यांने आपल्या पालकाजवळ कथन केल्यानंतर रेहानचे वडील शे.उस्मान यांनी प्रकाराबाबत मुख्याध्यापक मुजाहीदसर यांना विचारणा केली असता विद्यार्थ्यांनी शाळेत उशीरा येऊ नये याकरीता न भुतो न भविष्यती अशी अद्दल घडविण्यासाठी शिक्षा केल्याचे सांगितले. संडास साफ करुन घेतल्याने रेहान याची प्रकृती ढासळली असून त्याला ताप सुध्दा आला आहे. यामुळे सदर प्रकाराची सखोल चौकशी करुन दोषी मुख्याध्यापकास सेवेतून निलंबीत करण्याचीमागणी शे.रेहान यांचे वडील शे.उस्मान शे.दाऊद यांनी निवेदनाद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, शिक्षणमंत्री विनोद तावडे जिल्हाधिकारी बुलडाणा, खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ.संजय रायमुलकर, मुख्याधिकारी न.पा.लोणार, तहसिलदार लोणार, प्रधान सचिव शालेय शिक्षण मुंबई यांच्याकडे केली आहे.न.पा.उर्दु पुर्व माध्यमिक शाळा लग्न समारंभासाठी भाडेतत्वावर देण्यात येते. यावेळी शाळेतील शौचालयाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. सदर शौचालय स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची असतांना मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांकडून संडास स्वच्छ करुन घेणे कितपत योग्य आहे.- शे.उस्मान शे.दाऊदपालक, लोणारझालेल्या गंभीर प्रकाराबाबत चौकशीचे आदेश दिले असून विद्यार्थ्यांकडून शौचालय स्वच्छ करुन घेतल्याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकास कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.- विजय लोहकरेमुख्याधिकारी न.पा.लोणार
उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांस शौचालय साफ करण्याची शिक्षा
By admin | Published: October 12, 2016 6:44 PM