नागपूर : शासकीय सेवेत कायम करा, या प्रमुख मागणीसह मंगळवारपासून रस्त्यावर उतरलेल्या राज्यभरातील संगणक परिचालकांच्या मोर्चावर बुधवारी सकाळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात २००हून अधिक मोर्चेकरी जखमी झाले असून, त्यातील तिघांची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले जाते. जखमींमध्ये २० ते २५ महिलांचा समावेश आहे.महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात राज्यभरातील सुमारे २२ हजार संगणक परिचालक सहभागी असून, त्यांचा हा मोर्चा टेकडी रोडवर अडविण्यात आला आहे. कडाक्याच्या थंडीत अख्खी रात्र रस्त्यावर काढलेल्या मोर्चेकऱ्यांनी बुधवारी सकाळी अचानक आक्रमक भूमिका घेतली. काहींनी घोषणाबाजी करीत सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा, तर काहींनी पोलिसांचे कठडे तोडून फेकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी अगोदर वज्र व वरुणच्या माध्यमातून मोर्चेकऱ्यांवर पाण्याचा मारा केला. परंतु मोर्चेकऱ्यांनी त्यालाही जुमानले नाही. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. यामुळे पळापळीत चेंगराचेंगरीही झाली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोर्चेस्थळी पोहोचून पोलिसांच्या लाठीचार्जचा निषेध नोंदविला.ही जीवन-मरणाची लढाई...हा राज्यभरातील २७ हजार संगणक परिचालकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे सरकार आम्हाला न्याय देत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.जोश कायम ...लाठीमारामध्ये कुणाचा हात मोडला तर कुणाच्या पायाला गंभीर जखम झाली. शिवाय संघटनेचे अध्यक्ष सिद्घेश्वर मुंडे यांच्यासह अनेकांच्या शरीरावर लाठ्यांचे वळ उमटले. मात्र असे असताना सर्व मोर्चेकऱ्यांतील जोश कायम होता. रात्री उशिरापर्यंत सर्व मोर्चेकरी रस्त्यावर ठाण मांडून होते.मोर्चाचे कारण काय?सर्व ग्रामपंचायतींमध्ये २०११ पासून सुमारे २७ हजार तरुण-तरुणी ‘महाआॅनलाइन’ या कंपनीच्या माध्यमातून संगणक परिचालक म्हणून काम करीत आहेत. या कंपनीने सर्व संगणक परिचालकांना मोबाइलद्वारे संदेश पाठवून ३१ डिसेंबर रोजी सर्वांचे कंत्राट संपत असून, यानंतर कुणालाही नोकरी देण्यात येणार नसल्याचे म्हटले आहे.
नागपुरात मोर्चावर लाठीमार
By admin | Published: December 17, 2015 3:10 AM