ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. १३ - दारुबंदीसाठी नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणा-या महिलांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे. निघोज येथे दारुबंदीसाठी विहित मार्गाने मतदान घेण्यात यावे या मागणीसाठी सकाळी ११ वाजता या महिलांनी रास्ता रोको सुरु केला होता.
आंदोलक महिलांना रस्त्यावरुन हटविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करण्याचे धोरण घेतले. महिलांना ताब्यातही घेण्यात आले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर महिलांना सोडण्यात आले. दारुबंदीचा हा प्रश्न सोमवारी विधानसभेत उपस्थित करणार असल्याचे विखे यांनी सांगितले.
महिलांवर लाठीमार करणारे उपनिरीक्षक वायदंडे व दारुबंदीच्या मतदानासाठी टाळटाळ करणारे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आर.बी. सय्यद यांच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. दीड तास हे आंदोलन सुरु होते. त्यामुळे औरंगाबाद-पुणे ही वाहतूक विस्कळीत झाली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही निघोजच्या दारुबंदीबाबत यापूर्वी सरकारवर टीका केलेली आहे.