- दत्ता थोरे, लातूर
पाच पाच लाख लिटर पाणी घेऊन मिरजेहून निघालेली जलपरी उर्फ पाणी एक्सप्रेस अखेर लातूर जिल्ह्यात आली. सकाळी ११ वाजून १० मिनिटातून डिपार्चर झालेल्या जलपरीने मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास लातूर जिल्ह्यात प्रवेश केला. औसा रोड स्टेशनवर पहाटे ४ वाजेपर्यंत जलपरी थांबली होती. लातूरच्या रेल्वेस्थानकावर स्वागतासाठी थांबलेली गर्दी रेल्वे येणार नसल्याची कुणकूण लागल्यावर निघून गेली. स्वागताविना पहाटे ४ वाजेपर्यंत जलपरी औसा स्थानकावर उभी होती.
लातूर जिल्ह्याच्या हद्दीत आल्यानंतर ही जलपरी मुरुड-अकोला (ता. लातूर) नजिक औसा रोड स्टेशनवर आली आणि लातूरसह महाराष्ट्राच्या इतिहासात अनोखी नोंद झाली. लातूरपासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या मुरुड-अकोला नजिक औसा रोड स्टेशनवर पहाटे ४ वाजेपर्यंत ही जलपरी थांबली होती.
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ‘१५ दिवसात लातूरला रेल्वेने पाणी देणार’ ची घोषणा केली. मागच्या वर्षी आॅगस्टमध्येही अशीच घोषणा झाली खरी. पण पाणी आले नव्हते. यंदा घोषणेनंतर सातव्या दिवशीच पाणी आल्याने लातूरकरांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. पाच लाख लिटर पाण्याचे दहा रॅक घेऊन निघालेली जलपरी मजल-दरमजल करीत लातूर जिल्ह्यात आली. सुव्यवस्थेसाठी बदलली वेळ..!पाईपलाईनचे काम ताजे आहे. पाणी पडल्यानंतर ते खराब होऊ शकते. कामावर अंतिम हात मारण्याचे काम पहाटेपर्यंत सुरू होते. शिवाय, मध्यरात्रीच्या वेळी लातूरच्या रेल्वेस्थानकावर ही जलपरी आल्यावर उत्साही कार्यकर्त्यांच्या आनंदात बाधा येऊ नये, जास्तीत जास्त लोकांनी रेल्वेचे जंगी स्वागत करावे, यासाठी रेल्वेच्या आगमनाची वेळ बदलण्यात आली. त्यामुळेच लातूर जिल्ह्यात आगमन झालेल्या जलपरीला औसा रोड स्थानकावर थांबविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.