हणमंत गायकवाड
लातूर : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा बुरुज उभारणार की पुन्हा एकदा कमळ फुलणार, यासाठी चुरशीची लढत आहे. भाजपचे सुधाकर श्रृंगारे आणि काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे यांच्यात हा सामना रंगत आहे.
लातूर मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर पहिली सार्वत्रिक निवडणूक २००९ मध्ये झाली. ७ हजार ९७५ मताधिक्याने काँग्रेसने ही निवडणूक जिंकली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या दोन निवडणुकांमध्ये मोदी लाटेत भाजपने या मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित केले. २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुका एकतर्फी जिंकल्या. पण सध्याची निवडणूक भाजपला सोपी नाही. डॉ. शिवाजी काळगे यांच्या रूपाने काँग्रेसने कडवे आव्हान उभे केले आहे. तर भाजप वर्चस्व कायम ठेवण्यासाठी मोदी गॅरंटीचा नारा देत आहे. गेल्या दहा वर्षातील विकासकामांचा पाढा वाचला जात आहे. भाजपकडून ही निवडणूक मोदी गॅरंटीवर तर काँग्रेसकडून सुसंस्कृत नेतृत्वाच्या नावावर लढविली जात आहे.
आमदारांमध्ये स्पर्धामहाविकास आघाडीकडे लातूर लोकसभा मतदारसंघात तीन आमदार आहेत. मदतीला अनुभवी नेतृत्व आहे. डॉ. शिवाजी काळगे यांची भिस्त माजी मंत्री आ. अमित देशमुख, आ. धीरज देशमुख यांच्यावर आहे. लोहा-कंधारचे आ. श्यामसुंदर शिंदे यांचेही पाठबळ आहे. काँग्रेस, उद्धवसेना आणि शरद पवार गटाचे कार्यकर्तेही सोबत आहेत. महायुतीकडून खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, क्रीडामंत्री संजय बनसोडे, आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार, आ. बाबासाहेब पाटील आदी अनुभवी नेते खिंड लढवत आहेत. मतदारसंघात भाजपची बुथ यंत्रणा मजबूत आहे. एकंदर, आमदारांमध्ये मताधिक्यासाठी रस्सीखेच आहे. तसेच वंचित फॅक्टर मागच्या वेळी जोरदार होता.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
रेल्वे कोच कारखाना, पीटलाईन, रस्ते आदी कामांचा दावा खा. शृंगारे करतात. तर विरोधक संसदेत कधी तोंड उघडले का, असा आरोप करतात. लातूरच्या पाण्याचा प्रश्न, रुग्णालयासाठी जागा, उद्योग, बेरोजगारी, शेतमालाला भाव, रस्त्याची दुरवस्था, कृषी, सिंचन, सौरउर्जा हे प्रश्न चर्चेत. काँग्रेसकडून भाजपा व काँग्रेस दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची तुलना केली जात आहे. कोणता उमेदवार सभागृहात आपली भूमिका मांडू शकतो, हे लातूरकरांनी ठरवावे, असे आवाहन केले जाते.
गटातटाचा परिणाम नाही; मात्र थेट लढत भाजपमध्ये उघड गटबाजी नाही. परंतु, अंतर्गत हेवेदावे काहीवेळा कानावर येतात. मात्र लोकसभेच्या तयारीत सर्वांनाच एकत्र आणणारी यंत्रणा भाजपने राबविली आहे. काँग्रेसमध्ये नेतृत्व एकहाती आहे. जिल्ह्याचे काँग्रेसमधील राजकारण त्यांच्या भोवती फिरत राहते. त्यामुळे लढत थेट होणार आहे.