लातूर, दि. 27 - ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ब्रेन हॅमरेज होऊन उपचारादरम्यान मृत्यू पावलेले शहीद रामनाथ माधव हाके (वय 24 वर्षे) यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी मणेरवाडी (ता. चाकूर) येथे दाखल झाले आहे. आज येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हजारो नागरिकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली आहे.
लहानपनासूनच रामनाथ हाके यांना सैन्यदलात सामील होण्याची इच्छा होती. दोनच वर्षांपूर्वी ते सैन्यात भरती झाले होते. रामनाथ यांचा नुकताच विवाह ठरला होता. सध्या ते पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे कार्यरत होते. सिक्कीम येथे जमिनीपासून 18 हजार फूट उंचीवरील टेकडीवर कर्तव्य बजावत असताना 6 ऑगस्ट रोजी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता. त्यानंतर त्यांना तातडीने बागडोरा (प. बंगाल) येथील सैनिकी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (25 ऑगस्ट) मध्यरात्री दोनच्या सुमारास ते शहीद झाले. हाके यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक विवाहित बहीण असा परिवार आहे.
रामनाथ यांचे पार्थिव शनिवारी दुपारी बागडोगरा येथून सैन्य दलाच्या विमानाने दिल्ली येथे आणले त्यानंतर आज रविवारी त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी मणेरवाडी येथे आणले आहे. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.