लोकमत न्यूज नेटवर्कलातूर/उस्मानाबाद : मुंबई-लातूर एक्स्प्रेसचे बीदरपर्यंत केलेले विस्तारीकरण रद्द करून लातूररेल्वे पूर्ववत करावी. तसेच बीदरला स्वतंत्र रेल्वे सोडावी, या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवारी लातूर आणि उस्मानाबादेत बंद पुकारण्यात आला. या बंदला लातुरात उत्स्फूर्त तर, उस्मानाबादेत संमिश्र प्रतिसाद मिळाला.मुंबई-लातूर एक्स्प्रेस बचाव कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने लातूर शहरात तगडा बंदोबस्त ठेवला होता. जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले होते. बंदचे आवाहन करणाऱ्या कार्यकर्त्यांना सकाळी ११ वाजताच पोलिसांनी ताब्यात घेऊन सायंकाळी ५ वाजता सोडून दिले. बंदमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहरातील गंजगोलाई परिसरातील बाजारपेठ, सराफा लाईन, आडत बाजार, कपडा बाजार, स्क्रॅप मार्केट आदी महत्त्वाची बाजारपेठ कडकडीत बंद होती. मध्यवर्ती बसस्थानकातून तसेच अंबाजोगाई रोडवरील बसस्थानकातून सकाळी तासभर बसेस न सोडल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. ११ वाजेनंतर मात्र एस.टी. प्रशासनाने बसेस सोडल्या. अत्यावश्यक सेवा वगळून अन्य आस्थापने बंद होती.उस्मानाबाद जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़ शहर वगळता इतर तालुक्याच्या ठिकाणीही अत्यल्प प्रतिसाद मिळाला़ सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ येथे विविध पक्ष-संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले़
विस्तारीकरणाच्या विरोधात लातूर, उस्मानाबादेत बंद
By admin | Published: May 06, 2017 3:26 AM